मुंबई । देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या संरक्षण भिंतीचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. हे काम अर्धवट असल्याने पावसाळ्यात येथील कचरा बाजूच्या वसाहतीत वाहून जात असल्याने येथील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डम्पिंगवर कोट्यवधीचा खर्च केला जात असताना भिंतीचे काम रखडण्याचे नेमके कारण काय? असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. येत्या स्थायी समितीत प्रशासनाने याबाबतची माहिती द्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश
कोरगावकर यांनी दिले.
संरक्षण भिंतीचे काम 2015 पासून रखडले
मुंबईतील रोजच्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. सुका-ओला कचर्याच्या विल्हेवाटीसाठी मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी तेथेच करण्याबाबत पालिकेने सोसायट्यांना आदेश दिले आहेत. काहींनी याची प्रक्रियाही सुरू केली आहे. इतर उपाययोजनाही सुरू आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर जमा होणार्या कचर्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. मात्र, दुसरीकडे येथील संरक्षण भिंतीचे काम 2015 पासून रखडले आहे. डम्पिंगवर इतका खर्च केला जात असताना येथील संरक्षण भिंत बांधण्याचे काम का रखडले? भिंतीवर 8 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यापूर्वीही भरपूर खर्च करण्यात आला आहे. अजून किती खर्च करणार आहे? असा सवाल भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी स्थायी समितीत विचारला.
संरक्षण भिंतीअभावी नागरिक त्रस्त
यापूर्वी येथे भिंती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. 2012 पासून संरक्षण भिंतीची समस्या कायम आहे. 2014 साली दिलेले काम कंत्राटदाराने पूर्ण केले नाही. अपूर्ण काम करणार्या या कंत्राटदारावर पालिकेने काहीही कारवाई केलेली नाही. मागील दोन ते तीन वर्षांपासून काम अपूर्ण आहे.
संरक्षण भिंतीचे काम झाले नसल्याने डम्पिंगवरचा कचरा बाजूच्या रफिक नगर, बाब नगर येथील झोपड्यात वाहून येतो. अनेक वर्षांपासून येथील रहिवासी त्रस्त आहेत. पावसात वाहून येणार्या कचर्यामुळे रहिवाशांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते, असे सपाचे गटनेते रईस शेख यांनी सांगितले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी संरक्षण भिंतीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती द्या, अशी जोरदार मागणी केली.