देवपूर येथील दारू दुकान बंद करा

0

धुळे। देवपूर परिसरातील कुणाल बार व प्रिन्स वाईन्स शॉपच्या विरूद्ध मध्यवस्तीतील दारू दुकानांना दिलेल्या परवान्या विरूद्ध गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या महिला आंदोलनास यश मिळाले आहे. आमदार अनिल गोटे यांनी भाजपा नेते सतिश नेरकर व शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकूंदे यांच्यासह शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आदेशानंतर भेट घतली. शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा नगरसेविका तथा महिला आघाडीच्या नेत्या वैभवी दुसाने, सुनील नेरकर, योगेश मुकूंदे, अमित दुसाणे, भारती माळी, मेघल चौधरी, मनिषा चौधरी, वंदना विश्‍वकर्मा, बबीता हिरे, वैशाली पाटील, सीमा सोनार, अविनाश पाटील, प्रशांत जोशी, सागर कोडगिर आदींचा समावेश होता.

जिल्हाधिकरी, जिल्हा पोलीस अधिक्षकांना कारवाईचे आदेश
या भेटीदरम्यान अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना दूरध्वनीवरून सूचना देऊन लेखी आदेशही दिले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत व प्रामुख्याने कॉलनी भागात यानंतर कुठल्याही दारू दुकानाच्या स्थलांतरास परवानगी मिळणे सहज शक्य होणार नाही असे आदेश मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दहा मिनीटे शिष्टमंडळाशी चर्चा करून निवेदन दिले. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या 500 मीटरच्या आत मद्य दुकांना मज्जाव करण्यात आला आहे. यानंतर काही मद्य विक्रेते उच्चभ्रु वस्त्यांमध्ये येत आहेत. देवपूर परिसरात प्रभाग क्र. 6मध्ये कुणाल बिअर बार सुरू असून या दुकानात येणार्‍या ग्राहकांद्वारा परिसरातील महिला व मुलींच्या छेडखानीत वाढ झाली आहे. यात मद्यपी रस्त्यांवर मद्य पिणे, लघुशंका करणे, शिवीगाळे यासारखे प्रकार घडत आहेत. तसेच कुणाल बिअर बार शेजारीच नव्यानेच प्रिन्स वाईन्स शॉप हे दुकान येऊ घातले आहे. मनपाची किंवा परिसारातील नागरिकांची ना हरकत घेण्यात आलेली नाही. दारू माफीयांनी केवळ काही अधिकार्‍यांशी संगनमत करून पैशाच्या जोरावर दादागिरीने सुशिक्षीत परिसरात दारू दुकान सुरू करण्याचा घाट घालण्यात आला असल्याचे म्हटले आहे.