जळगाव। शहरात अनेक दशकांनंतर ‘अमृत’सारखी मोठी योजना आलेली असून यासाठी संतोष इन्फ्रा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व विजय कन्स्ट्रक्शन यांनी काम मिळविले आहे. मात्र, ते अमृत योजनापूर्ण करू शकतील का?, अशी शंका असल्याचे मनसेचे स्वीकृत नगरसेवक अनंत जोशी व्यक्त केली आहे. तसेच संतोष इन्फ्र्रा व विजय इलेक्ट्रीकल्स यांनी काम पूर्ण केले तरी ते दर्जेदार करतील का?, असा प्रश्न उपस्थित होत असतांना आयुक्त व शहर अभियंत्यांनी कोर्टात हमीपत्र देवून मक्तेदाराकडून आम्ही दर्जेदार काम र् करून घेऊ असे सांगितले आहे. प्रत्यक्षात हे दोघे अधिकारी दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांनी असे हमीपत्र कोर्टासमोर देणे किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करत यात मोठी देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप केला आहे.
व्यक्तीगत जबाबदारीचे औचित्य काय?
प्रत्यक्षात योजना सुरू होईल तेव्हा दोघे अधिकारी मनपात कार्यरत नसणार. तेव्हा, त्यांनी असे हमीपत्र देणे कितपत योग्य आहे असा सवाल नगरसेवक जोशी यांनी केला आहे. मक्तेदाराकडून अमृत योजना रखडली तर जळगावकरांना पुन्हा वेठीस धरले जाईल अशी शंका जोशी यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही प्रकल्पात प्रशासकीय अधिकार्यांने स्वतः व्यक्तीगत जबाबदारी स्विकारणे कितपत योग्य आहे याची विचारणाही त्यांनी केली आहे. असे करणे म्हणजे कार्यक्षेत्राचे बाहेर जाऊन कृती करणे असून यातून देवाणघेवाण झाल्याचे दिसत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.
निवृत्तीनंतरही जबाबदारी घेणार का?
अमृत योजने अंतर्गत संपूर्ण शहरासाठी नव्याने पाईप लाईन तसेच नविन टाक्या आदींचे कामे केले जाणार आहेत. त्यानंतर दुसर्या टप्प्यात भूमिगत गटारी बनविले जाणार आहे. परंतु, या योजनेला ग्रहण लागले असल्याचे मत जोशी यांनी मांडले आहे. काम कोणाला द्यावे अथवा कोणाला मिळावे यावरून वाद सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना आयुक्त, शहर अभियंता कोर्टात भूमिका मांडतांना मक्तेदाराची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. हे दोघ अधिकारी निवृत्तीनंतरही याची जबाबदारी घेतील काय असा रोखठोक सवाल अनंत जोशी यांनी केला आहे.