आपल्याच भूमीत आज मराठीला अस्तित्वासाठी झगडावे लागते; यापेक्षा वाईट काही असू शकते का? मराठी अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ येऊन ठेपली असून, मराठी माणसाने यासाठी पुढाकार घेतला नाही, तर मराठी आपल्याच राज्यात उपरी होईल. मराठी चित्रपटांना याच भूमीत प्रदर्शनासाठी झगडावे लागणे हे काही चांगले लक्षण नव्हे. संजय निरूपम यांच्यासारखा भंपक पुढारी केवळ परप्रांतीयांना कुरवाळण्यासाठी मराठी चित्रपटांची गळचेपी करत असेल तर अशा घरभेद्याला अद्दल घडविण्यासाठी मराठी माणसानेच पुढे यायला हवे. मराठीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार नीलेश राणे आणि तत्सम मराठीप्रेमी राजकारण्यांनी पुढे येण्याची वाट पाहणे धोक्याचे ठरेल. मराठी आपली माय म्हणजेच देव आहे. या ‘देवा’साठी ‘टायगर’ समोर आला तरी त्याच्याकडे पाठ फिरवत प्रथम ‘देवा’कडे मराठी माणसाने वळायला हवे.
मराठी साहित्य असो की चित्रपट, त्यांना चांगले दिवस येण्यासाठी मराठी माणसानेच पुढाकर घेतला पाहिजे. यासाठी कुणी आवाहन किंवा जागे करण्याची गरजच नाही. ज्या मराठीला आपण आपली माय म्हणतो त्या मायेसाठी दुसर्याने जागे करण्याची गरजच काय? आपल्याकडे मराठी चित्रपटांसाठी निर्मात्यांना आणि कलाकारांना मराठी राजकीय नेत्यांचे पाय धरावे लागतात हे दुर्देवच. मराठी मुलखात मराठीसाठी मराठी माणसालाच करावी लागणारी ही कसरत आपल्याच दुर्लक्षितपणामुळे सुरू आहे. मराठीमध्ये कसदार साहित्य आणि हिंदीचे आव्हान पेलणारे चित्रपट जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत मराठीला आपल्या अस्तित्वासाठी असेच झगडावे लागू शकते. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये थारा नाही. याबाबत नेहमीच मराठी निर्माते आणि कलाकार नाराजी व्यक्त करतात. पण, मराठी माणूस मात्र मूग गिळून गप्प आहे. मराठी चित्रपटांना केवळ सिंगल स्क्रिन चित्रपटगृहातच जागा मिळते आणि तेथूनही तो लवकरच हटविला जातो. अगदी मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळाली तरी प्राईम टाइम मिळत नाही. तेथेही अन्यायच होतो. कारण प्रेक्षकांचा सर्वाधिक कल हा हिंदी चित्रपटांकडे असतो. यापैकी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त हे मराठी प्रेक्षक असतात. त्यामुळे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून देतात. केवळ पैसा हाच निकष चित्रपटगृहांचे मालक लावत असल्याने हिंदी चित्रपटांना झुकते माप मिळते. राजकारण्यांनी धमक्या देऊन आणि राडा करून किती दिवस मराठी चित्रपटांनी स्क्रिन आणि प्राइम टाइम मिळवून घ्यायचा, याबद्दलही विचार करावा लागणार आहे. मराठी चित्रपट जगविण्याची वेळच येता कामा नये. मराठी चित्रपट जेव्हा चित्रपटगृहाच्या मालकांना गल्ला मिळवून देतील त्यावेळी आपोआपच मराठी चित्रपटांचे अस्तित्वासाठी धडपडणे बंद होईल. परंतु, यामध्ये मराठी माणसाचीही भूमिका तेवढीच महत्वाची ठरणार आहे. त्याशिवाय तर हे शक्यच नाही. अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर काही दिवसांपूर्वी ‘वजनदार’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचवेळी रॉक ऑन हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला होता. पण, वजनदारच्या तुलनेत ‘रॉक ऑन’ कमी पडला आणि वजनदारचे वजन वाढले. रॉक ऑनची पिछेहाट झाली. एक-दोन दिवसांतच रॉक ऑन चित्रपटाचे शो काढण्यात आले आणि त्याठिकाणी मराठी वजनदार झळकू लागला होता. म्हणूनच हिंदीला तोडीसतोड असे मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजेत. असे चित्रपट मराठी निर्मात्यांनी तयार केले तर पैशासाठी हपापलेले चित्रपटगृहचालक आपोआपच जागा आणि प्राइम टाईमदेखील देतील. यासाठी मराठी चित्रपटांनीही पारंपरिक वाट सोडून वेगळी वाट धरायला हवी. तेच-तेच उथळ विषय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करतात. म्हणून प्रेक्षकांना आकर्षित करणारी चांगली निर्मिती झाली पाहिजे.
येत्या शुक्रवारी ‘देवा’, ‘गच्ची’ हे दोन मराठी आणि ‘टायगर जिंदा है’ हा हिंदी चित्रपट प्र्रदर्शित होत आहे. देवामध्ये अंकुश चौधरी तर टायगरमध्ये सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. टायगर हा १४० कोटींचा बिग बजेट चित्रपट असून, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटगृह चालकांना आणि वितरकांना दमच भरला आहे की, हा चित्रपट पाहिजे असेल तर ९५ टक्के शो आम्हाला द्या. मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांवर अन्याय करत असल्याने अशाप्रकारची धमकी मराठी निर्माते देऊ शकत नाहीत. उलट त्यांच्यावर राजकीय नेत्यांचे पाय धरण्याची वेळ येते. देवाच्या धास्तावलेल्या टीमने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजचा रस्ता धरल्याने आता ठाकरे हे देवाच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे देवा चित्रपटास जागा, वेळ मिळेलही पण ही स्थिती आता बदलायला हवी. मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि मनसैनिक नेहमीच पुढे असतात हे कौतुकास्पद आहेच. परंतु, प्रत्येक मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळवून देण्यासाठी राज ठाकरे यांना आपली शक्ती वापरावी लागणे हे भूषणावह नाहीच. राहिला प्रश्न तो मराठीद्वेष्ट्या आणि चित्रपटगृह मालकांची बाजू घेणार्या संजय निरूपम यांचा. तर अशा नेत्यांनाही मराठी माणसांनी वेळीच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. खाल्ल्या मिठाला जागणे म्हणजे काय? हे निरूपम यांना शिकविण्याची वेळ आता आली आहे. टायगर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग फुल्ल झाले आहे. एक तिकिट अडीच हजार रूपयांना विकले गेल्याचेही बोलले जाते. यामध्ये मराठी माणसाचा वाटा किती? आणि असेल तर त्या मराठी माणासांनी आपल्या ‘देवा’चाही विचार करावा, असे प्रेक्षकांना सूचवावेसे वाटते. असे केल्यास आपल्या मराठी टायगरला ‘देवा’साठी डरकाळी फोडण्याची गरज भासणार नाही. परंतु, ही मराठी अस्मिता जागी होण्यास खूपच उशीर झाला तर चित्रपटगृहांमधून मराठी चित्रपट हद्दपार झालेला असेल. आणि ज्यावेळी आपल्याला जाग येईल तेव्हा मराठी माणसालाच म्हणावे लागेल, ‘देवा’, तुला शोधू कुठं. कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात देवा, तुला शोधू कुठं!