पुणे : पुण्यातील प्रभात रोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीत शहरातील प्रख्यात विकसक व बांधकाम व्यावसायिक देवेंद्रभाई शहा यांच्या गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्याकांडाने पुणेसह पिंपरी-चिंचवडमधील बिल्डर लॉबी चांगलीच हादरली आहे. या हत्याकांडाने अंडरवर्ल्डचा हात असावा, अशी पोलिसांना शंका असून, मारेकरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये ठळकपणे दिसून येत आहेत. दोनपैकी एका मारेकर्याची ओळख पटली असून, त्याला त्याच्या नातेवाईकांनीही ओळखले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्राने दिली. गोळी घालणार्या मारेकर्याच्या जवळच्या नातेवाईकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे लवकरच मारेकर्यांना अटक केली जाईल, असेही हे सूत्र म्हणाले. दरम्यान, हे हत्याकांड जमिनीच्या व्यवहारातून झाले असावे, असाही एक संशय असून, त्यादृष्टीनेही पोलिसांचे एक पथक काम करत आहे. या घटनेमागे अंडरवर्ल्डचा हात असल्याचा संशय असला तरी, शहा यांच्याशी जमिनीच्या व्यवहारातून असलेल्या वादातूनच हे हत्याकांड घडविण्यात आले असावे, असेही सूत्र म्हणाले. या घटनेच्या तपासकामाबाबत वरिष्ठस्तरीय अधिकार्यांनी मात्र अधिकृत माहिती देण्याचे टाळले. संशियतांना अटक केल्यानंतर पुणे पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेऊनच माहिती देतील, असेही सांगण्यात आले.
कोणत्याहीक्षणी आरोपींना अटक!
पुणेसह संपूर्ण राज्यातील बिल्डर लॉबी हादरविणार्या देवेंद्रभाई शहा यांच्या हत्याकांडाचा तपास डेक्कन जीमखाना पोलिस व गुन्हे शाखेचे पथक करत आहे. त्यासाठी वेगवेगळी पथकेही तपासास लागली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काल रात्री संशयिताच्या जवळच्या नातेवाईकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्याने गोळ्या घालणार्या मुख्य आरोपीस ओळखले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. या माहितीनुसार, मारेकर्याच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली होती. शहा यांचे मुळशी, पौंड, शिरवळ या भागात मोक्याचे भूखंड असून, त्या जमिनीला सोन्याचे भाव आहेत. त्यांची हत्यादेखील जमिनीच्या व्यवहारातील पैशातून झाली असावी, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे. त्या अनुषंगाने एक पथक चौकशी करत आहेत. मारेकरी पोलिसांच्या दृष्टीपथात आलेले आहेत. या हत्याकांडामागे अंडरवल्ड कनेक्शन असावे, असा संशयही पोलिसांना आहे. त्या अनुषंगानेही एक पथक चौकशी करत होते. हत्याकांड घडले तेव्हा देवेंद्रभाई यांचा 24 वर्षीय मुलगा अतित शहा हादेखील घटनास्थळी होता. परंतु, मारेकर्यांनी त्याला इजा न पोहोचविता देवेंद्रभाईंनाच गोळ्या घातल्या. त्यामुळे मारेकरी शहा यांना जवळून ओळखत असावेत, अशी माहितीही वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. आरोपींना कोणत्याहीक्षणी अटक केली जाईल, असेही हे अधिकारी म्हणाले.
संशयित आरोपी पुण्यात पसार?
पुणे शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आम्ही संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. तर उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले, की या गुन्ह्याचा तपास सर्व अंगांनी केला जात आहे. काही पथके जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडविण्यात आले का, याचीही चौकशी करत आहेत. कारण, शहा यांचा जमिनी खरेदी-विक्री करण्याचाही व्यवसाय होता. त्यामुळे हत्याकांडासंदर्भातील सर्व पार्श्वभूमी पोलिस तपासून पाहात आहेत. अतिशय थंड डोक्याने हा खून करण्यात आला असून, पोलिसांनी हस्तगत केलेल्या सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी ठळकपणे दिसून येत आहेत. हे फुटेज मारेकर्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला दाखविले असता त्याने मुख्य आरोपीस ओळखले आहे. त्याचा शहरात शोध घेतला असता तो फरार झाल्याचे दिसून आले, असेही एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. त्याच्या अटकेसाठी पथके रवाना झालेली आहेत. डेक्कन जीमखाना पोलिसांनी या खूनप्रकरणी दोन आरोपींविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.