देशांतर्गत विमान प्रवासासाठी लागणार पासपोर्ट, आधारकार्ड!

0

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवासासाठीही पासपोर्ट किंवा आधारकार्ड लागणार आहे. विमान प्रवासात गैरवर्तन करणारे आणि गुन्हेगार यांची काळी यादी तयार करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला असून, अशा प्रवाशांची ओळख पटवण्याकरता आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड दाखवावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकार्‍याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर विमान वाहतूक मंत्रालयाने ’नो फ्लाय लिस्ट’ म्हणजे काळी यादी बनवण्याच्या दृष्टीने कामही सुरू केले आहे.

लवकरच मसुदा जनतेसमोर ठेवणार
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, मंत्रालय लवकरच ’नो फ्लाय’ यादी जारी करणार आहे. ज्यात चार प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई निश्‍चित होणार आहे. या चार प्रकारचे गुन्हे केल्यास तुमच्या हवाई प्रवासावर प्रतिबंध असेल. मात्र ही व्यवस्था लागू करण्याआधी प्रवाशांची ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांना विमान तिकीट बुकिंगच्या वेळी पासपोर्ट किंवा आधार कार्ड दाखवावे लागेल. या दोन्हीमधील कोणतेही एक दस्तावेज ग्राह्य धरले जाणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय पुढच्याच आठवड्यात हा नियमांचा एक मसुदा बनवून जनतेसमोर ठेवणार आहे. जनतेलाही या मसुद्यावर अभिप्राय देण्यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. जून किंवा जुलैमध्ये हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा या मसुद्यावर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर हा मसुदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आधीपासूनच पासपोर्ट द्यावा लागतो आहे. सरकारला हाच नियम भारतातही लागू करावा लागणार आहे. त्यानुसारच एअरलाइन्स कंपन्यांनीही अधिकार्‍यांशी उद्दामपणे वागणार्‍या प्रवाशांची ओळख पटवणेही सुरू केले आहे.