नवी दिल्ली । काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी रविवारी लष्करप्रमुखांचा उल्लेख रस्त्यावरील गुंड असा केला. त्यांनी हे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच दीक्षित यांनी माफी मागितली. भाजपने याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
नंतर माफी मागितली
संदीप दीक्षित म्हणाले की, आमचे लष्कर सक्षम असून भारतीय लष्कराने नेहमीच पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान केवळ घोषणाच करू करते. वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपले लष्करप्रमुख रस्त्यावरील गुंडाप्रमाणे वक्तव्य करतात. पाकिस्तानी असे करू शकतात कारण ते तसेच आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र असणार्या संदीप यांनी नंतर माफी मागितली. आपण चुकीचे बोललो. आपण याबद्दल माफी मागत असून आपले ते वक्तव्य मागे घेत आहोत.
सोनिया गांधींनी माफी मागावी
काँग्रेसने या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत आपण लष्कराचा सन्मान करत असल्याचे सांगितले. संदीप यांनी लष्करप्रमुखांबद्दल असे वक्तव्य करायला नको होते, असे पक्षाने म्हटले आहे. सोनियांची माफी मागावी, अशी भाजपकडून मागणी करण्यात आली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, काँग्रेसचा एक नेता देशाचा आणि सैन्याचा अपमान करत आहे. लष्कराचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. काँग्रेसने संदीप यांना पक्षातून काढावे आणि सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी.
लष्करप्रमुखांना म्हटले होते जनरल डायर
इतिहासकार आणि बंगाली लेखक पार्थ चटर्जी यांनी काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांची तुलना जनरल डायर यांच्यासोबत केली होती. चटर्जी यांचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतरही चटर्जी हे आपल्या विधानावर कायम राहिले होते.
काँग्रेसने लष्करप्रमुखांना रस्त्यावरील गुंड म्हणण्याची हिंमतच कशी केली? त्यांच्यासोबत प्रॉब्लेम काय आहे?
– किरण रिजिजू, केंद्रीय गृहराज्यमंत्री