देशाच्या चौकीदाराने देश आणि राज्यातील तरुणाईला फसवलं – धनंजय मुंडे

0

सिन्नर : साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीएसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडं मोडलं यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही अशा शब्दात सरकारच्या कारभारावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सिन्नर येथील सभेत शरसंधान साधले.

मी खाणार नाही आणि खायला देणार नाही असे सांगून तुम्हाला लुटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मन की बात मध्ये ५६ एपिसोड झाले परंतु ५६ इंचाची छाती कुठे दिसली नाही अशी कोपरखळीही धनंजय मुंडे यांनी केली. सबका साथ सबका विकास सोडून राममंदिराचा मुद्दा आणला. परंतु हा मुद्दा त्यांना वनवासात जावे लागणार आहे त्यावेळी लक्षात येतो असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

महाराष्ट्राला बरबटून आणि ओरबाडून खाण्याचे काम भाजपने केले असून आपल्या मंत्र्यांची सगळी पापं झाकण्याचे काम केले असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. नाशिकचा नावलौकिक आदरणीय छगन भुजबळ साहेबांमुळे झाले आहे. अडीच वर्षे भुजबळ साहेबांना छळलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण केले गेले नाही असे सांगताना छगन भुजबळ दिल्लीपासून राज्यातील भाजप नेत्यांना पुरून उरतील कारण राष्ट्रवादीचे सैन्य त्यांच्यासोबत आहे. आम्ही मेलेल्या आईचे दुध प्यायलेलो नाही सर्व शक्तीनिशी पुरुन ऊरु असा इशाराही धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत दिला.

भुजबळांना त्रास देणार्‍यांना धडा शिकवा – जितेंद्र आव्हाड

भुजबळांना दिलेल्या वागणूकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात राफेल ते नथुराम गोडसे आणि भगवा ते भाजपच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. नाशिकच्या समस्या ते बंद करण्यात आलेल्या कारखान्यांमुळे स्थानिक तरुणांचे रोजगार कसे बंद केले यावर भाजपवर शरसंधान साधले.

या सभेत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनीही आपले विचार मांडले. यावेळी शहीद केशव गोसावी यांच्या पत्नी काव्या गोसावी यांना विद्यार्थ्यांनी जमवलेला ५० हजारांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील सभेला ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार हेमंत टकले, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार समीर भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,माजी आमदार जयंत जाधव, नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे, पुणे माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदींसह सिन्नर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.