मंचर । देशाच्या विकासात व भरभराटीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची, अखंडतेची काळाची गरज आहे. एक विचाराने राहत असल्याने भारताची प्रगती झाली आहे, असे मत उद्योजक अजय घुले यांनी व्यक्त केले. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पंडित रामप्रसाद, बिस्मित-असफाकुल्लाह आंध्रप्रदेशाचे प्रमुख लेखक सय्यद नाशिर अहमद यांनी लिहलेल्या रामप्रसाद बिस्मित-असफाकुल्लाह खान’ या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्योजक अजय घुले, धर्मवीर पतसंस्थेचे संचालक पप्पू थोरात, डॉ. शकील जाफरी, प्रा. सपना उगले, प्रा. कैलास एरंडे, प्रा. संजय पोकळे, प्रा. मारूती गुंजाळ, प्रा. तानसेन रणदिवे, प्रा. संजय पवळे व कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
…म्हणूनच स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी समिर्पित भावनेने कार्य केले आहे. जात, पात, धर्म, वंश, प्रांत या पलिकडे जाऊन केवळ देशाभिमानाने झपाटून लढा दिला आहे. यातूनच आपले स्वातंत्र्याचे दिव्य स्वप्न पूर्ण झाले आहे, असे मत प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केले. आण्णासाहेब आवटे महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन समितीकडून अ श्रेणी प्राप्त झाल्याचे औचित्यसाधून व्यावसायिक अजय घुले व पप्पू थोरात यांनी केक कापून आनंद व्यक्त केला. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल प्राचार्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक प्रा. कैलास एरंडे यांनी तर संजय पोकळे यांनी आभार मानले.
देशातील 270 शहरात पुस्तकाचे प्रकाशन
हिंदू-मुस्लिम ऐक्य वाढीस लागण्याची गरज आहे. पंडित रामप्रसाद बिस्मीत-असफाकुल्लाह खान यांच्या हौतात्म्य दिवसाचे औचित्य साधून आंध्रप्रदेशचे प्रमुख लेखक सय्यद नाहीर अहमद यांनी हे पुस्तक लिहिले असून इंग्रजी, उर्दु, तेलगू या तीन भाषेत हे पुस्तक प्रकाशित झाले आहे, असे डॉ. शकील जाफरी यांनी सांगितले. मंचर येथील सामाजिक विचारवंत डॉ. शकील जाफरी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला असून आझाद हौस ऑफ पब्लिकेशन, उंडवल्ली (आंध्रप्रदेश) तर्फे प्रकाशित या पुस्तकांचे प्रकाशन एकाच दिवशी पूर्ण भारतातील 270 शहरात झाल्याची माहिती डॉ. जाफरी यांनी यावेळी दिली.