नवी दिल्ली । देशातील राजकारण सध्या वाईट वळणार असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्ष वातावरण कलुषित करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील शेतकर्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.
यूपीएच्या योजनाच नाव बदलून आणल्या
मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा शरद पवार यांनी तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. गेल्या तीन वर्षात देशाची प्रगती साधण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे, अशीही टीकाही शरद पवार यांनी केली आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून यूपीए सरकारच्या योजनाच नाव बदलून जनतेसमोर आणल्या आहेत. आधार, मनरेगा, डायरेक्ट कॅश या योजनांचा भाजपने विरोधी बाकांवर असताना कडाडून विरोध केला. मात्र आता याच योजना नव्या रूपात लोकांसमोर आणल्या जात आहेत.
पीक विमा कोणाच्या फायद्याचा
पीक विम्याच्या नावाखाली 16 हजार कोटी रूपयांचा प्रीमियम भरला. मात्र, प्रत्यक्षात केवळ 7 हजार कोटी रुपयेच शेतकर्यांना मिळाले. मग पीक विमा शेतकर्यांच्या फायद्याचा की विमा कंपन्याच्या?, असा सवाल पवारांनी विचारला
निर्यातबंदी मोदी सरकारने वेळेत का उठवली नाही?
यूपीए सरकारने 2009 या एका वर्षात 10 लाख लोकांना रोजगार दिले. शेतकर्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महाराष्ट्रात भिजत पडला आहे. तसेच मध्य प्रदेशातही आंदोलने होत आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीत शेतकर्यांकडेही सरकार दुर्लक्ष करते आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यंदा देशात डाळींचे भरघोस उत्पादन झाले तरीही निर्यातबंदी मोदी सरकारने वेळेत का उठवली नाही? असाही प्रश्न विचारायला शरद पवार विसरले नाहीत. गेल्या दोन वर्षात रोजगाराच्या 2 लाख संधी निर्माण झाल्या. एकंदरीतच आज झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळावर टीकेचे आसूड ओढले आहेत.