देशातील घराणेशाही, धर्मांध सत्ता संपविण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल – ॲड. बाळासाहेब आंबेडकर

0

अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेस लोटला जनसागर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीने देशाच्या राजकारणात नवा पर्याय दिला आहे, नवा बदल आणला आहे, बीड मतदार संघ हा नवा पायंडा पाडणार आहे. अनेकांना चिंता आहे की हा पर्याय यशस्वी होईल काय? परंतु आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मला खात्री आहे की, हा पर्याय देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल. निवडणुकीत पुढील काळात जात व पैसा महत्त्वाचा राहणार नाही तर उमेदवाराचे कर्तृत्व पाहिले जाईल. देशातील घराणेशाही, जातशाही आणि धर्मांध सत्ता संपविण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल. असे प्रतिपादन राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ मोंढा मैदान येथे रखरखत्या उन्हात जनसागर लोटला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या येथील संपुर्ण सभेचे उत्कृष्ट संयोजन देविदासराव बचुटे यांनी केले होते. यावेळी मोंढा मैदान येथे आयोजित प्रचारसभेच्या विचारमंचावर ॲड. आण्णाराव पाटील, फिरोज लाला, प्रा.किसन चव्हाण, राजेंद्र क्षीरसागर अजिंक्य चांदणे, उमेदवार प्रा.विष्णू जाधव, प्रा.एस.के. जोगदंड, शैलेश कांबळे, अमोल पौळे, संजय साळवे, अरुण बनसोडे, अमोल हतागळे, प्रमोद सिताप, विशाल जोगदंड, सुखदेव भुंबे, लंकेश वेडे,मारुती सरवदे, पंकज काटे, प्रा.रमीज सर, मंगलाताई मोरे, ॲड.विलास लोखंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना ॲड.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, भारताने पाकिस्तानचे विमान पाडल्याचे खोटे असल्याचे खुद्द अमेरिकेने केलेल्या नव्या खुलाशामुळे उघड झाले आहे. तेव्हा धर्माच्या नावाने मते मागून पंतप्रधान झालेल्या मोदी यांनी आता देशाची माफी मागावी व सर्जीकल स्ट्राईक बाबत देशाला सत्य सांगावे. बी.एस.एफ.चे चाळीस जवान हे राज्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचे सांगून चंबळ खोऱ्यातले डाकू संपले. परंतु,आता सत्ताधारीच डाकुवाद करु लागल्याचे दिसत आहे. नोटाबंदीद्वारे काळ्या पैशातला अर्धा पैसा राज्यकर्त्यांनी लाटल्याचा घणाघाती आरोप ॲड.आंबेडकर यांनी यावेळी केला. भारताची अर्थव्यवस्था बिघडली असून बेरोजगारी वाढली आहे. लोक म्हणतात मोदीला पर्याय नाही. परंतु, मतदान करुन पर्याय देता येतो, हे विसरु नका. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांना कपबशी या चिन्हा समोरील बटन दाबून आपले मत देऊन विजयी करा. “बिजेपी ही खाई असून राष्ट्रवादी काँग्रेस हा कुंआ” आहे. तेव्हा सर्व मुस्लीम बांधवांनी डोळसपणे मतदान करावे. असेही ॲड.आंबेडकर यांनी नमूद केले. त्यासोबत वंचित बहुजन आघाडी हा नवा पर्याय निर्माण झाल्याचे सांगून मतदारांनी भाजपा व राष्ट्रवादीला मतदान करु नये, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले.

आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांनी सभेला संबोधित करताना सांगितले की,समोरचे उमेदवार हे श्रीमंतांचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. बीड जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागे आहे. वंचित बहुजन आघाडीने विजय संपादन केल्यास अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लावू, तसेच धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात कृष्णा खोऱ्यातील पाणी आणुन हा परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ करुत, समोरचे विरोधक हे मुलभूत प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी आपसात भांडण्याचे नाटक करीत आहेत. या जिल्ह्यात रेल्वे नाही, मुबलक विज व एम.आय.डी.सी.ही नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार, ऊसतोड कामगारांना सन्मानाने जगता यावे यासाठी अद्यापपर्यंत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी कांही केले नाही. जनतेला भावनिक करुन निवडणुका जिंकल्या. तेंव्हा सुज्ञ मतदारांनी हे वास्तव ओळखून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना भक्कमपणे साथ द्यावी, असे आवाहन केले.

प्रचारसभेचे सूत्रसंचालन बबन वडमारे यांनी करुन उपस्थितांचे आभार देविदास बचुटे यांनी मानले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभेच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. रखरखत्या ऊन्हात मोंढा मैदानात अक्षरश: जनसागर लोटला होता. युवक,ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान बालके यांनीही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचार सभेस मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी भिमराव सातपुते, प्रा.किसन चव्हाण यांची समायोचित भाषणे झाली.