देशातील जनतेला गुंगीचे औषध दिलेले आहे; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

0

मुंबई : जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देत सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

‘अण्णांचा लढा भ्रष्टाचारविरोधी आहे व देशाचीच ती समस्या आहे. पण, आमरण उपोषण करुन प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा व देशाला जाग आणावी. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले व त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरु दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे व लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही!”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी अण्णांच्या ‘आमरण उपोषणास’ शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक, तितकाच हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.