देशातील पहिली झिरो एनर्जी शाळा शिरुर तालुक्यातील वाबळेवाडीची

0

पुणे । शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. तिच जिल्हा परिषद शाळा आता देशातील पहिला झिरो-एनर्जी शाळा झाली आहे. बँक ऑफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधायला सुरू केलेल्या 8 झिरो-एनर्जी क्लासरूम नुकत्याच तयार झाल्या आहेत.

पिसा अभ्यासक्रम प्रस्तावित
या शाळेला राज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून या शाळेत पिसा अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. तो येत्या जूनपासून सुरू होत आहे. शाळेच्या दर्जात्मक कामाची दखल घेऊन मागील मार्चमध्ये अमेरिकेची ट्रेझरी-बँक बँक ऑफ न्यूयॉर्कने आठ वर्गखोल्या उभ्या करून दिल्या. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यामातूनही कामास अर्थसाह्य मिळाले आहे.

वर्गखोल्यांचे अधुनिक बांधकाम
वर्गखोल्यांच्या बांधकामात नवीन प्रकारच्या पूर्णत: काचेच्या 22 फूट रुंद, 22 फूट लांब तसेच 14 फूट उंचीच्या 8 वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक आहेत. पॉलिकार्बोनेट व टेनसाईल मेंब्रेन यांचे द्विस्तरीय छत, टफन ग्लासच्या भिंती आहेत. चारही बाजूंनी 5 फुटांचे पन्हाळ छत प्रत्येक वर्गाला उभे केले आहेत. छताचा पहिला स्तर टेन्साईल मेम्ब्रेनचा असून त्यामुळे प्रकाश स्वीकारणे व उष्णता परावर्तित हे दोन्ही साध्य होते. त्याखालील स्तर हा पॉलिकार्बनचा असून पॉलिकार्बनच्या रासायनिक संरचनेमुळे प्रकाशाचे विस्तारीकरण होत असल्याने वर्गखोलीत थंड, उल्हसित व उबदार प्रकाश प्रत्येक वर्गखोलीत मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
आठही वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच करण्यात होणार आहे. ग्रामीण भागात शहरी वातावरणयुक्त व जागतिक स्पर्धेशी तुलना करणारे शिक्षण कसे दिले जाईल, याचा आराखडा तयार करून 15 ऑगस्ट 2012 रोजी या प्रकल्पाचा ठराव ग्रामसभेत मांडला. 350 लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांनी वाबळेवाडीत आधुनिक शिक्षण संकुल उभे केले आहे.
-दत्तात्रय वारे, मुख्याध्यापक