देशातील महिला नाही तर कॉंग्रेस असुरक्षित-आशिष शेलार

0

भाजपाच्‍या महिला कार्यकर्त्‍या अन्‍य पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांसारख्‍या कटींग आणि सेटींग करणा-या नाहीत 

मुंबई- देशातील महिला असुरक्षित नाही तर या देशातील कॉंग्रेस असुरक्षित झाली आहे. म्‍हणून देशातील जनेतेमध्‍ये असुरक्षितचे वातावरण निर्माण करून आपली खुर्ची आणि नेतृत्‍व सुरक्षित करीत आहेत, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. यावेळी त्‍यांनी भाजपाच्‍या कार्यकर्त्‍या या अन्‍य पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांप्रमाणे कटींग आणि सेटींग करणा-या नाहीत असा टोलाही लगावला.

मुंबई भाजपाच्‍या महिला मोर्चाच्‍या कार्यकारीणीची बैठक आज दादर येथे वसंत स्‍मृती सभागृहात पार पडली. भाजपाच्‍या महिला मोर्चाच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षा विजया रहाटकर यांच्‍या हस्‍ते या कार्यकारीणीचे उद्धाटन करण्‍यात आले तर मुंबई महिला मोर्चाच्‍या अध्‍यक्षा शलाका साळवी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या कार्यकारीणीचा समारोप मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला. भाजपाच्‍या नगरसेविका, मुंबई महिला मोर्चाच्‍या पदाधिकारी, जिल्‍हा, आणि मंडळाच्‍या सुमारे 400 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होत्‍या.

समारोपाच्‍या भाषणात आमदार अॅड आशिष शेलार यांनी महिला कार्यकर्त्‍यांना संघटन, संपर्क, संवाद, संवेदना आणि संघर्ष असा पाच सुत्री कार्यक्रम दिला. महिला कार्यकर्त्‍यांनी प्रत्‍येक बुथवर पाच महिला कार्यकर्त्‍यांची नियुक्‍ती करून संघटन बुथ पर्यंत पोहचविण्‍याचे काम केले पाहिजे. तर केवळ सोशल मिडियावर संपर्क न साधता थेट घरा घरात जाऊन संपर्क साधून सरकारची कामे आणि भाजपाचे संघटन तळागाळपर्यंत पोहचवले पाहिजे. समाजात महिलांसाठी काम करणा-या विविध संस्‍था आणि व्‍यक्‍ती असून त्‍यांच्‍याशी संवाद साधला पाहिजे. तर समाजात महिलां विषयी घडणा-या सुख-दुःखाच्‍या गोष्‍टीं बाबत सदैव संवेदनशील असायला हवे. प्रसंगी मदतीसाठी धावून जायला हवे. तर महिलांच्‍या प्रश्‍नांवर, विषयावर व महिलांवर होणा-या कोणत्‍याही स्‍वरूपाच्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात तसेच अन्‍य पक्षासोबत ही संघर्ष करण्‍याची तयारी ठेवायला हवी अशी पंचसूत्री त्‍यांनी महिला कार्यकर्त्‍यांना दिली.

देशातील महिला असुरक्षित आहेत असे खोटेनाटे अहवाल येत आहेत. देशातील महिला नाही तर या देशातील कॉंग्रेस पक्ष असुरक्षित झाला आहे. म्‍हणून ते समाजामध्‍ये असुरक्षिता, भय पसरवत आहेत. त्‍यांची खुर्ची व नेतृत्‍व सुरक्षित करण्‍यासाठीचा हा खटाटोप आहे हे भाजपा कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात यायला हवे व त्‍याबाबत सदैव जागृत असायला हवे असे सांगतानाच मला भाजपाच्‍या महिला कार्यकर्त्‍यांचा अभिमान आहे. अत्‍यंत बिकट परिस्थितीपासून आजपर्यंत संघर्ष करीत त्‍यांनी काम केले आहे. भाजपच्‍या कार्यकर्त्‍या या इतर पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांप्रमाणे सेटींग आ‍णि कटींग करणा-या नाहीत याची मला खात्री आहे असा टोला लगावला.