जळगाव । देशात अघोषीत आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजातील प्रत्येक घटक शासनांवर नाराज आहे. बेरोजगारांना प्रत्येक वर्षी 2 लाख रोजगाराची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नोटाबंदीमध्ये 41 लाख कर्मचार्यांना नोकरी गमवावी लागली आहे. शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करण्यात येत आहे. युवकांचा स्कॉलरशीपचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यांना रोजगार नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान परदेश दौरे करतात मात्र यातून रोजगार निर्मिती होत नसून याबाबत बूथ स्तरावर जनजागृती करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँगे्रस अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केला.
मेळाव्यात यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणतर्फे जिल्हस्तरीय ‘वन युथ 15 बूथ संकल्प मेळाव्या’चे सरदार वल्लभाई पटेल सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी विधानपरीषद अध्यक्ष अरूणभाई गुजराथी होते. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष आ. सतिष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रा. कल्पना पाटील, किसान सेना अध्यक्ष सोपान पाटील, युवा जिल्हाध्यक्ष ललीत बागूल, माजी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, रविंद्रभैय्या पाटील, राजेश वानखेडे, राजेश पाटील, संजय चौधरी, परेश कोल्हे, योगेश देसले, प्रा. मिनाक्षी चव्हाण, रजनी पाटील, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.
जबाबदारी सर्वांनी वाटून घ्यावे – आमदार डॉ. सतिश पाटील
जबाबदारी एकांवर टाकण्यापेक्षा सर्वांनी सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे अशी अपेक्षा आमदार डॉ. सतिश पाटील रांनी व्रक्त केली. देशाच्या नेतृत्त्वाबाबत चीड निर्माण झाली आहे. याचा फायदा आपण घेतला नाही तर आपणच त्याला दोषी ठरू, किसन सेलचे सोपान पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी धक्काबुक्की याविरोधात आपण आवाज उठवयला पाहिजे अशी अपेक्षा सतिष पाटील यांनी व्यक्त केली. काल एकनाथाराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी माझ्यावर चुकीच्या केसेस केल्या गेल्यात व यामागे एक मंत्री आहे. तो मंत्री कोण आहे, याचा शोध आपल्या युवकांनी घ्यायला पाहिजे, असे आवाहन आमदार डॉ.सतिश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
सोशल मिडीयाचा वापर करा- कोतेपाटील
राज्य हगणदारी मुक्त झालेले नसतांना मुख्यमंत्री पत्रकार परिषदे घेवून राज्य हगणदारी मुक्त झाले असल्याची घोषणा करतात. त्यांची पध्दतही खोटे बोलायचे पण रेटून बोलयचे अशी असल्याचीही टीका संग्राम कोते-पाटील यांनी केली. कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. 2009मध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार होते आता केवळ एक आमदार आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकात रोष आहे त्याचे रूपांतर आपणला मतदानात घ्यावयाचे असेल तर आपणाला बूथस्तरावर जावे लागेल असे आवाहन संग्राम कोतेपाटील यांनी केले.
भाजपावर सोडले टिकास्त्र
पोलीस कर्मचारी, जिल्हाधिकारी, कमिशनर हे भाजपाचा कार्यकर्ता असल्यासारखा वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात अघोषीत आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने नोटीफीकेशन काढून युपीएससी, एमपीएससी परीक्षा न देता अधिकारी बनण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रात 14 लाख विद्यार्थी एमपीएससी व युपीएससी परीक्षा देत आहेत. आज या 14 लाख विद्यार्थ्यांची व त्यांच्या आई-वडीलांची स्वप्न धुळीस मिळवत आहे. आरएसएसची विचारणीचे मुल त्याच्या माध्यमातून अधिकारी वर्गांत घुसवण्याचा नियोजन त्यांचे सुरू असल्याचा आरोप संग्राम कोतेपाटील यांनी केला.
गावातील प्रश्न सोडवा- गुजराथी
अध्यक्षस्थानांवरून बोलतांना अरूणभाई गुजराथी यांनी सांगितले की, बूथ कार्यकर्त्यांनी माझा गाव माझी जबाबदारी असे समजून गावांतील प्रश्न सोडविण्यास प्राधन्य द्यावे. सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघाली आहे. बेरोजगारीत वाढ झाली आहे. परदेशी भांडवल वाढले नाही. मोदी सरकार जाहिरातींवर दररोज 4 कोटी खर्च करीत असल्याची टीका अरूणभाई गुजराथी यांनी केली. आगामी महापालिका निवडणूकीत महापौर निवडतांना राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका राहील असे स्पष्ट केले.