देशात उष्णतेची लाट; घराबाहेर पडणे टाळा

0

नवी दिल्ली – दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात उष्णतेची लाट आली असून राजस्थानच्या चुरू येथे ५० डिग्रीच्या वर तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या बांदा आणि प्रयागराजमध्ये तापमान ४८ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. राजधानी दिल्लीतील उष्णतेने गेल्या १८ वर्षातील विक्रम मोडला आहे.

मंगळवारी ते ४७.६ डिग्री सेल्सियस होते. उष्णतेच्या लाटांचा तडाखा अद्यापही महाराष्ट्राला बसत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे वातावरण तापदायक बनले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील भारतातील लगतच्या अंतर्गत भागात वारे वाहतील. हवामान खात्याने आवाहन केले आहे की दुपारच्या वेळी सावध आणि सतर्क राहा, दुपारी १ ते सायंकाळी ५ दरम्यान बाहेर जाणे टाळा हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मे पर्यंत उष्णतेची तीव्र परिस्थिती असेल. २८ मेच्या रात्रीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.