देशात कन्फ्युजनवाले नव्हे तर कमिटमेंटवाले सरकार-मोदी

0

नवी दिल्ली-देशात सध्या कन्फ्युजनवाले नव्हे तर कमिटमेंटवाले सरकार आहे. त्यामुळेच देशात आज ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ सारखे निर्णय घेतले जात आहेत. त्याचबरोबर ‘वन रँक वन पेन्शन’ सारखा अनेक दशकांपासून अडकलेला निर्णय लागू होतो. एनडीएत समाविष्ट असणारे गरीबीतून वर आले आहेत. त्यामुळेच आमची गरीबांसाठी अच्छे दिन आणणे ही सर्वांत मोठी प्राथमिकता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ओडिशातील कटक येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

आपला देश बदलू शकतो, असे गेल्या चार वर्षांत १२५ कोटी भारतीयांना वाटते आहे. आज देश काळ्या पैशापासून ‘जनधन’कडे अर्थात वाईट सरकारकडून चांगल्या सरकारकडे वळला आहे, असेही मोदी यांनी सांगितले. आमचे असे सरकार आहे ज्यांचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सर्वजण गरीबीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गरीबांसाठीचे सरकार आहे. काँग्रेसला हे का कळले नाही की, यापूर्वी गरीबांना बँका दारातही उभ्या करीत नव्हत्या. गरीबांनाही काही मुल्ये आहेत, त्यांनाही जीवन विम्याची गरज असते हे काँग्रेसला आजवर का कळू शकले नाही? असा सवाल यावेळी मोदींनी विचारला.

२०१४पर्यंत ३९ टक्के जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत होत्या, सध्या हा आकडा ८० टक्के इतका आहे. स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशात सुमारे ६ कोटी शौचालये होती. मात्र, गेल्या चार वर्षांतच ७.५ कोटी शौचालये बांधण्यात आली, अशी माहिती यावेळी मोदींनी दिली.

कटकच्या जनतेशी बोलताना मोदी म्हणाले, ४ वर्षांपूर्वी देशाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते, त्यावेळी देशात काय वातावरण होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या देशावर ४८ वर्षे राज्य करणाऱ्या कुटुंबाने देशासाठी किती काम केले हे समजून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, तुमच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने आणि आशाच मला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटकच्या जनतेला यावेळी भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला.