नवी दिल्ली । देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रपतिपदाचा एका महिन्याचा कार्यकाळ शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संवाद साधला. प्रणव मुखर्जी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. रोजगार क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी तरुण पाऊल ठेवत आहेत. पण त्यांच्यासाठी त्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत, असे ते म्हणाले. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रातील मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत विविध क्षेत्रांत संपादित केलेल्या यशाचा लेखाजोखा मांडला जात आहे. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. पण सरकारनेच राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2014 पासून डिसेंबर 2015 या दोन वर्षांच्या काळात प्रत्यक्षात 5 टक्के रोजगारही उपलब्ध झाले नाही, असे दिसून येते. एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना आता राष्ट्रपती मुखर्जी यांनीही बेरोजगारीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. देशात पुरेशा प्रमाणात रोजगार संधी निर्माण होत नाहीत. देशातील उद्योगांसाठी पूर्ण प्रशिक्षण देणार्या व्यवस्थापन शिक्षणाची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. दरवर्षी रोजगार बाजारात पाऊल ठेवणार्या एक कोटी तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आपल्याला ‘स्टार्ट अप’वर भर द्यावा लागेल. तसेच आपल्याला लघुद्योग सुरू करायला हवेत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
देशाकडे सर्वाधिक युवाशक्ती आहे. पण आपल्याकडे असलेली ही शक्ती रोजगार उत्पादकतेत रुपांतरित होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा योग्य लाभ मिळणार नाही, असेही मुखर्जी म्हणाले. देशातील युवकांना अधिकाधिक रोजगार देण्यावर भर दिला पाहिजे, त्यांच्यासाठी पुरेशा आणि नवीन रोजगार संधी निर्माण करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.