पुणे । साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यातील अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन करावे; या उद्देशाने परिसंवाद, व्याख्यान, अनुभवकथन, माहितीपट, चित्र प्रदर्शन अशा उपक्रमांची मेजवानी असलेल्या देशातील पहिल्याच यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 7 या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे. कर्दळीवन सेवा संघाने यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत. सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म, चित्र प्रदर्शन, असे कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत.
लेखक, परिक्रमार्थी, यात्रा-परिक्रमा आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागी होणार असल्याचे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी सांगितले. या संमेलनातून निमाड अभ्युदय या भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमा किनारी स्थापन केलेल्या गरीब मुलांच्या शैक्षणिक व निवासी प्रकल्पासाठी संमेलनामध्ये सहभागी होणार्या रसिकांच्या सहकार्याने 5 लाखांचा सामाजिक निधी अर्पण केला जाणार आहे.