देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा डाव सुरू आहे – अजित पवार

0

कोल्हापूर : देशात जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनुवादी प्रवृत्तींनी पुन्हा डोकंवर काढलं आहे असून देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर आहेत. त्यांना संसारी माणसांचं दु:ख कळत नाही. म्हणूनच ते करतात एक आणि वागतात वेगळं,’ असा चिमटा काढतानाच केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसल्याचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.

अरबी समुद्रात बोटीला झालेल्या अपघातावरूनही त्यांनी भाजपवर निशाना साधला. अरबी समुद्रात चमकोगिरी करायला गेल्यानेच एकाचा मृत्यू झाल्याचं पवार म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जास्त होत होती. त्यामुळेच महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार

शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही पवार म्हणाले. मात्र सध्या लोकसभा उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नको, असंही त्यांनी सांगितलं. तसंच आगामी निवडणुकांसाठी ‘एक बूथ आणि २५ यूथ’ अशी व्यूहरचना करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तर शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच त्यांना कळत नाही. शिवसेना बावचळून गेल्याची बोचरी टीकाही अजित पवार यांनी केली.