देशात राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासह सामाजिक सलोख्यासाठी दुवा पठण

0

भुसावळ विभागात बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण

भुसावळ- देशात राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासह सामाजिक सलोखा अबाधीत रहावा, शांतता नांदावी व पाऊस-पाणी चांगला होण्यासाठी भुसावळ विभागात प्रार्थना करण्यात आली. बकरी ईदनिमित्त ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. याप्रसंगी सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

भुसावळात मशिदीत नमाज पठण
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानाऐवजी शहरातील मशिदींमध्ये बुधवारी नमाज पठण करून देशभरात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी लोकप्रतिनिधींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छाही दिल्या.

यावलमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी दिल्या शुभेच्छा
यावल- शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या ईदगाह मैदानावर बुधवारी मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज सामूहिकरीत्या अदा केली. सर्वधर्मीय बांधवांनी ईदगाह मैदानावर जावुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सकाळी 8.45 वाजतला चोपडा रस्त्याला लागुन असलेल्या अक्सा नगराजवळील ईदगाह मैदानावर हजरत अब्दुल शमीम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परीसरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. सकाळच्या सत्रात पाऊस थांबल्याने ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव नमाज करीत एकत्र झाले होते तर अनेेकांनी स्थानिक मशिदीत नमाज अदा केली. माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, उपविभागीय पोेलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, विजय जावरे उपस्थित होते. प्रसंगी हबीब मंजर, नगरसेवक शेख असलम, रईस, अनसार, गफ्फार शाह, फारुख हाजी आदी उपस्थित होते.