देशात लौकिक झालेले ‘सारथी’ काढले मोडीत

0

पिंपरी-चिंचवड : कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाने महापालिकेच्या सोयीसुविधे संदर्भात केलेल्या तक्रारींची दखल घेवून 24 तासात निराकरण करणारे ‘सारथी’ हेल्पलाईन मोडीत निघाल्यात जमा आहे. कारण नागरिक थेट तक्रार करत असल्याने आपले महत्व कमी होत असल्याचा समज करून काही असंतुष्ट नगरसेवकांनी वेबपोर्टल चालविणार्‍या कर्मचार्‍यांना दम दिला आहे. मात्र, याची कल्पना नसल्याने नागरिकांकडून दररोज तक्रारींचा पाऊस पडूनही तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे उघडकीस आले आहे.

घरबसल्या तक्रारींचे निराकरण
तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कल्पकतेने ‘सारथी’ ची उभारणी केली होती. या पोर्टलचे नाव काहीच दिवसांत सर्वतोमुखी झाले होते. महापालिकेसंदर्भात कोणतीही तक्रार प्रत्येकाला घरबसल्या इंटरनेटव्दारे करता येवू लागली. तसेच याबाबत तक्रार क्रमांकांसह काय कार्यवाही होत आहे याचे उत्तरही मिळत असे. तसेच 24 तासांत तक्रारींचे निराकरण होवून तसे संबधीत नागरिकाला कळविले जात होते. शिवाय यातून समाधान झाले नसल्यास पुन्हा तक्रार करता येत होती. या पोर्टलला मोठ्या संख्येने ‘लाईक्स’ मिळत होत्या. या पार्श्‍वभूमीवर पोर्टलचा देशात नावलौकिक झाला होता.

असुंष्ट नगरसेवकांमध्ये भीती
दरम्यान, या हेल्पलाईनमुळे आपले महत्व कमी होत असल्याचा समज काही नगरसेवकांचा झाला. कारण नागरिक आपल्या दारात समस्या घेवून येणे बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी हेल्पलाईन चालकाला दम देवून ही यंत्रणा विस्कळीत केली आहे. याची कोणीही कल्पना नसल्याने नागरिक दररोज या हेल्पलाईनवर तक्रारी मांडत असतात. मात्र, याची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे सारथी नागरिकांच्या दृष्टीने कुचकामी ठरू लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीत जाणे शक्य होत नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारणेही अशक्य असते. अशा वेळी त्यांना सारथीसारख्या सुविधेची अत्यंत आवश्यकता भासते. महापालिकेने लोकाभिमुख प्रशासनांतर्गत अनेक घोषणा केल्या. नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारींचे निराकरण करता येईल. अशी घोषणा केली. तक्रार नोंदविण्याची यंत्रणा हायटेक असली तरी तक्रारींचे निराकरण करण्याबाबत अधिकार्‍यांचीच उदासीनता आहे.

लोकशाही दिन उपक्रमाची आवश्यकता
पूर्वी महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या उपक्रमाचे आयोजन केले जात होते. या उपक्रमात थेट तक्रारदार नागरिक उपस्थित राहात. तेथेच संबंधित अधिकाजयांकडून त्यांच्या समस्येचा निपटारा केला जात असे. अधिकाजयांनाही नागरिकांच्या समस्येचे मुदतीत निराकरण करणे भाग पडत असे. हा लोकशाहीदिनाचा उपक्रम बंद पडल्याने अधिकाजयांचे फावले आहे. जोपर्यंत कामाचा आढावा घेणारी यंत्रणा कार्यान्वीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांना असेच हताश आणि हतबल व्हावे लागणार आहे.