नवी दिल्ली: सध्या देशभरात लोकसभा निवडणूक सुरु आहे. आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोग आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून होणाऱ्या आचारसंहिता भंगावर निवडणूक आयोगाच्या मौनावर कॉंग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच देशात सध्या ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ असल्याचा खोचक टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे बॅलेट पेपरवरील कमळाच्या चिन्हाखाली भाजप असे लिहिण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हे नाव हटविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात विरोधकांच्या एका गटाने निवडणूक आयोगाचे सुनील अरोरा यांच्याकडे तक्रार केली. तसेच चिन्हाखाली असलेले भाजपचे नाव हटवा अन्यथा इतर पक्षांच्या चिन्हाखाली देखील त्या पक्षांचे नाव लिहा, अशी मागणी केली आहे.
ईव्हीएमवर देखील भाजपच्या निशानीखाली पक्षाचे नाव लिहिलेले दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने बॅलेट पेपरवर भाजपच्या असलेल्या नावावर आक्षेप नोंदविला आहे. हा आक्षेप फेटाळत निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरमध्ये बदल करण्यात येणार नाही असे सांगितले आहे.