देशाला बुद्धांच्या विचारांची गरज : अमोल मिटकरी

0

सांगवी परिसरात संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात

सांगवी : आज देशाला जाती-पातीवरून अनेक वाद निर्माण होत आहे. धर्मा-धर्मात वाद चिघळत आहेत. देशामध्ये अराजकता वाढली आहे. त्यामुळे आज देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. पुर्वी या देशात चार्तुवर्ण्य व्यवस्था होती. जाती भेद नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी बुद्धांच्या समता आणि बंधुतेचा वारसा जपला. बुद्ध या देशाचे मुळ पाईक आहेत, असे मत व्याख्याते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. सांगवी येथे भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ‘बुद्धांचा संत व महापुरूषांवरील प्रभाव’ या विषयावर व्याख्यान देताना मिटकरी बोलले.

अनिष्ट रूढींविरूद्ध ज्योतिबांचा संघर्ष
मिटकरी पुढे म्हणाले की, 18व्या शतकात बालविवाह, केशवपन, सती जाण्याची पद्धत या रूढींविरूद्ध सावित्रीबाई व जोतीबांनी संघर्ष केला. त्यांनी माणसा-माणसात धर्म व जातीच्या नावाखाली विभागणार्‍यांना धडा शिकवला. छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून आपल्याला महाराष्ट्र दिला. त्यांनी अनेक निर्णय जनतेच्या हिताचे घेतले. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा देश आज घडविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संतांवर व अंध भक्तांवर सडकुन टीका केली.

सकाळच्या सत्रात महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने महिला, मुलींनी सहभाग घेतला. तक्षशीला महिला संघाने स्वागत गीत व नृत्य सादर केले. महास्थवीर भदन्त ज्ञानज्योती महाथेरो यांच्या धम्मदेसनानंतर खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचे सी.ई.ओ.अमोल जगताप यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री जाधव यांनी केले. सुत्रसंचलन दयानंद चव्हाण यांनी केले. तर आभार सुजाता निकाळजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अमरसिंह आदियाल, राहुल काकडे, राहुल वाघमारे, वसंत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.