देशाला ५६ पक्षांची नाही तर ५६ इंच छाती वाल्याची आवश्यकता:देवेंद्र फडणवीस

0

वर्धा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी देशभरात मोदी विरोधक एकत्र झाले आहे. विरोधकांनी महाआघाडी स्थापन करून मोदींना पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने इतर पक्षांसोबत आघाडी केली आहे. महराष्ट्रात 56 पक्ष एकत्र आले आहे. मात्र देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वर्धा येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने विदर्भावर अन्याय केला. मात्र मोदींमुळे विदर्भावरील अन्याय दूर झाला. विदर्भाच्या पुत्राला मुख्यमंत्री बनवलं, विदर्भातील अनेक पुत्रांना मंत्री बनवलं, विदर्भात 15 वर्षात जे आघाडी सरकारकडून विकास झाला नाही तेवढा विकास आम्ही या 4 वर्षात विदर्भात केला आहे.त्यामुळे विदर्भातील सर्व 10 जागा युतीच जिंकणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सुपडा साफ करणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आज एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो, मात्र गेली 50 वर्ष काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवलं आहे, आता लोकांना तुम्ही एप्रिल फूल बनवू शकत नाही अशी खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची उडवली त्याचसोबत मागील निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांची सभा वर्धा येथूनच झाली होती. वर्धाची भूमी महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं काँग्रेसला विसर्जित करा, नरेंद्र मोदींनी वर्धा येथूनच काँग्रेस विसर्जित करण्यास सुरुवात केली. आज काँग्रेस लोकसभेत, विधानसभेत, जिल्हा परिषदेत एवढचं नाहीतर ग्रामपंचायतीत काँग्रेसला विसर्जित करण्याचं काम भाजपाने केलं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.