देहूरोड : प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त देहू आणि देहूरोड परिसरातील शिव मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आले.
विकासनगर रस्त्यावरील शंकर मंदिरात ट्रस्टच्यावतीने मंडप उभारण्यात आला होता. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती होऊन भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. चेलूराम दांगट, किसनराव नेटके, राजेंद्र नेटके, सुमनताई नेटके तसेच मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने घोरावडेश्वर डोंगरपायथ्याला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डोंगरावरील पाय वाटेवर पथदिवे लावून प्रकाशव्यवस्था करण्यात आली. पाण्याचा टँकर आणि अग्निशमन व्यवस्थाही उपलब्ध करून दिल्याचे शेलार यांनी सांगितले.