देहूरोड कॅन्टोन्मेंट मतदार याद्यांमध्ये अनेक चुका

0

बोर्डाच्यावतीने मतदार यादी नुकतीच केली प्रसिद्ध; काहींपुढे अर्धवट पत्ता तर कुठे पत्ताच नाही

अजब कारभार बोर्डाच्या केला प्रगणकांनी

देहुरोडः देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये अनेक चुका उघडकीस आल्या आहेत. काही ठिकाणी मतदारांचा राहण्याचा पत्ता अर्धवट आहे तर काही नावांपुढे पत्ताच नसल्याचा प्रकार देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीने उघडकीस आला आहे. मतदारांचा संपूर्ण पत्ता लिहिण्याबाबत कॅन्टोन्मेंट निवडणूक नियम-2007 नुसार स्पष्ट सूचना असतानाही संपूर्ण पत्ता लिहिण्याचे बहुतांश ठिकाणी टाळले असल्याचे दिसत असून, काही मतदारांचा पत्ता चक्क पुणे-मुंबई रस्ता असा लिहिलेला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रतिवर्षी प्रमाणे कॅन्टोन्मेंट निवडणूक नियम 2007 नुसार 1 जुलैला बोर्डाच्या हद्दीतील सातही वार्डांची वार्डनिहाय मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीची पाहणी केली असता सातही प्रभागातील मतदारयादी सदोष असून, मतदारांच्या पत्त्यांमध्ये अनेक चुका असल्याच्या वॉर्डांत विविध ठिकाणी व वेगवेगळया पत्त्यांवर राहत असूनही एकच पत्ता दिल्याचा तसेच काहींच्या नावापुढे पत्ताच नसल्याचा अजब कारभार बोर्डाच्या काही प्रगणकांनी केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदारांचा ढोबळ पत्ता
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे नियम 2007 नियमान्वये बोर्डाला मतदार यादीचा नमुना देण्यात आलेला आहे. त्यानुसार कागदावर डाव्या कोपर्‍यात वॉर्ड क्रमांक, उजव्या बाजूला भाग क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. मात्र बोर्डाच्या वॉर्डनिहाय मतदारयादीत काही ठिकाणी तसा उल्लेख केलेला दिसत नाही. तसेच मतदाराचा अनुक्रमांक, मतदाराचे नाव, वय, लिंग, अनुसूचित जाती-जमाती, व पूर्ण पत्ता घर क्रमांकासह लिहिणे आवश्यक असताना अनेक मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ अगर अर्धवट लिहिला आहे. घराच्या पत्त्यांच्या रकान्यात काही ठिकाणी फक्त गावांची नावे टाकली आहेत. काही ठिकाणी परिसराचे नाव लिहिले आहे. परिसराचे नाव टाकताना चुका केलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्ताच लिहिलेला नाही. नियमानुसार बंधनकारक असतानाही पत्त्यात घर क्रमांक लिहिणे टाळले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बोर्ड हद्दीतील विविध भागातील प्राथमिक मतदारयादीतील काही मतदार बोगस आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदारांचे पत्ते अचूक घेण्याबाबत मतदारयादी तयार करण्यापूर्वी बोर्ड कार्यालयात कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सर्व प्रगणकांना मतदारांची नावे व पूर्ण पत्ते अचूक लिहिण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे मतदार यादी पाहून स्पष्ट होत आहे.