देहू कमान ते झेंडे मळा पालखी मार्गाचे होणार रुंदीकरण आणि मजबुतीकरण

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीबाहेरील देहू कमान ते झेंडे मळा या पालखीमार्गाचे महापालिकेतर्फे रूंदीकरण आणि रस्ता मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आली असून 12 कोटी 37 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा 15 मीटर रूंदीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे सन 2008 साली हस्तांतरीत केला आहे. त्यानंतर महापालिकेने या महापालिका हद्दीबाहेरील रस्त्यावर खड्डे बुजविण्या व्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही.

देहू ग्रामपंचायतीसह महापौरांची मागणी
या रस्त्यावर वारी आणि पालखीच्या वेळी वारकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. या रस्त्याचे रूंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याची मागणी देहू ग्रामपंचायत आणि महापौर नितीन काळजे यांनीही केली होती. त्यामुळे देहू कमान ते झेंडे मळा रस्त्याचे रूंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. हा रस्ता करण्यासाठी 19 ऑगस्ट 2017 रोजीच्या महापालिका सभेत 35 कोटी रूपये रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी 10 कोटी तरतुद उपलब्ध करण्यात आली आहे.

15 मीटर लांबीचा रस्ता
हा रस्ता रस्ते विकास योजना आराखड्यानुसार, 30 मीटर रूंदीचा असून त्यापैकी 15 मीटर रूंदीचा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. सद्यस्थितीत या जागेवर सात मीटर रूंदीचा डांबरी रस्ता आहे. हा पालखी मार्ग महापालिकेला वारंवार दुरूस्त करावा लागतो. त्यामुळे ताब्यातील 15 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2017-18 मध्ये कामाचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच दरपृथ्थ:करणानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी सविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार, 13 कोटी 25 लाख रूपये अर्थसंकल्पीय रक्कम येते. कामाची आवश्यकता लक्षात घेऊन या कामाची निविदा काढण्याचे ठरविण्यात आले.

निविदेची मुदत 29 जानेवारी
या कामासाठी शहर विकास आराखडा या लेखाशिर्षावरील एकूण तरतुदीमधील 10 कोटी रूपये तरतुद वर्ग करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत देहू कमान ते झेंडे मळा रस्त्याचे रूंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी 12 कोटी 37 लाख रूपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. 29 जानेवारी पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.