
निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला होता. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. उद्या शनिवारी पालखी पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे. देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर अनगडशहाबाबा दर्गा येथे पहिली अभंगआरती झाली. चिंचोली पादुका येथे दुसरी अभंगआरती झाली. माळवाडी, झेंडेमळा, देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि देहूकरांचा निरोप घेऊन पुणे-मुंबई महामार्गाने पालखी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारक-यांची रांग, टाळ-मृदंगाचा गजर आणि रिमझिम पावसात आनंदाला आलेली भरती असे मनमोहक दृश्य शहरवासियांना अनुभवयास मिळाले.