जामनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे दुकानांना निर्बंध लागू केले आहे. असे असतांना सील केलेल्या दुकानांच्या नोटीसा फाडुन दुकाने खुली करणार्या व्यापार्यांवर जामनेरात आज नगरपालिका प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जामनेर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी स्थापन केलेल्या पथकाने शहरातील दुकानांवर कायदेशिर कार्यवाही केली होती. यात जनरल ,कटलरी, इलेक्ट्रॉनिक, कापड, सलून व इतर याना परवानगी नसतांना देखील उघडी ठेवली म्हणून काही दुकानं सील करून दुकानांवर नोटीस डकविल्या होत्या. मात्र दि. 9 रोजी शहरातील दुकानदारांनी या नोटीसा फाडुन चक्क दुकाने खुली केली होती. एवढेच नव्हे तर दुकानात कोरोनाविषयक कुठलेही नियम पाळण्यात आले नव्हते. यासंदर्भात दि. 10 रोजी ‘दै. जनशक्ति’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारी मुख्याधिकारी राहुल पाटील, उपमुख्याधिकारी दुर्गेष सोनवणे, पथक प्रमुख गजानन माळी यांनी नोटीस व सील तोडल्या प्रकरणी वैष्णवी क्रिएशन, वैष्णवी ड्रेसेस, राधेश्याम ड्रेसेस, गुरुनानक ड्रेसेस, संदीप होजीअरी, आनंद जनरल या दुकानांच्या संचालकांना कार्यवाहीबाबत नोटीस बजावण्यात आली. तालुका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दुकान सिल तोडून उघडलेले असल्याचे निदर्शनास आलेे आहे. तरी लॉकडाऊनच्या आदेशाचा अवमान केला म्हणून 10 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दंड न भरल्यास फौजदारी
सील फाडुन दुकाने खुली करणार्या व्यापार्यांना दंडाच्या नोटीस बजावण्यात आल्या असुन दंडाचा भरणा नगरपालिकेत येऊन करावयाचा आहे. दंडाचा भरणा न केल्यास फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशा आशयाची नोटीस देखिल नगरपालिका प्रशासनातर्फे व्यापार्यांना बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Prev Post
Next Post