दोंडाईचा पोलीस निरीक्षकांना राष्ट्रवादी प्रवक्ता नवाब मलिकांची धमकी

0

स्टेशन डायरीत निरीक्षकांची नोंद ; आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा

जळगाव– शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर भाजपावर टिकेची झोड उठली असतानाच रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्यावर केलेल्या आरोपप्रकरणी दोंडाईचा पोलिसात दाखल अदखलपात्र गुन्ह्याचा तपास सुरू असताना चौकशीकामी पत्र पाठवल्याचा राग आल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना भ्रमणध्वनीवरून धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे तर निरीक्षकांनी या प्रकाराची नोंद घेत स्टेशन डायरीत या प्रकाराची नोंद केल्याने खळबळ उडाली आहे. 9 फेबु्रवारी 2018 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मलिक यांनी निरीक्षकांना मोबाईलवरून धमकावल्याची केल्याची माहिती पुढे आली आहे.

मलिक म्हणाले, आंदोलन छेडतो, तर जबाबदार पोलिसच
निरीक्षक पाटील यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिलेल्या माहितीनुसार, 9 रोजी दुपारी 12.30 वाजता मलिक यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधत अदखलपात्र गुन्ह्याचा तुम्ही तपास कसे करीत आहात? असा प्रश्न उपस्थित करीत आपण गुन्ह्याच्या तपासासाठी दोंडाईचा यायला तयार आहोत व आल्यानंतर उपोषण आंदोलन छेडू व त्यानंतर निर्माण होणार्या कायदा-सुव्यवस्थेला आपणच जबाबदार रहाल, असे सांगत सत्ता बदलत राहते, असेही बजावल्याचे निरीक्षक म्हणाले. या प्रकाराची त्यांनी लागलीच वरीष्ठांना कल्पना देत स्टेशन डायरीत नोंद केली. या प्रकारानंतर 10 रोजी याच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश मोरे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या प्रकारासंदर्भात रीट याचिका दाखल करू, असेही मलिक यांनी बजावले.

दोंडाईचा नकोच, निरीक्षकांना हवी बदली
निरीक्षक हेमंत पाटील यांनी या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बदलीसाठी अर्ज केला असून दोंडाईचा पोलीस ठाणे नको असल्याचे कळवले आहे. या बाबीस स्वतः निरीक्षकांनी दुजोरा दिला. डॉ.हेमंत देशमुख विनाकारण आपल्याविरुद्ध अर्जफाटे करीत नाहक आरोप करीत त्रास देत असल्याचे निरीक्षक म्हणाले.

रावल-मलिकांमध्ये यावरून पेटला होत वाद
विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी व फेरमूल्यांकणासाठी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर शेतकर्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केला होता तर रावल यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान मलिक यांना देत अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देतानाच दोंडाईचा पोलीस ठाण्यात 29 जानेवारी तक्रार नोंदवल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्या आला. या प्रकरणाचा तपास स्वतः निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे होता.