दोंडाईचा प्रकल्पाच्या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी

0

चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील मृत्यूमुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या राज्य सरकारने या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील औष्णिक प्रकल्पाच्या अनुषंगाने झालेल्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांच्या आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी ज्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती यांच्या नावाची घोषणा केली जाईल. तसेच येत्या तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. बावनकुळे यांनी यावेळी प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाबद्दलच्या तांत्रिक बाबींची माहिती सभागृहाला दिली.

दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, राज्याच्या मंत्रालयाच्या इतिहासातील ही कदाचित सर्वाधिक दुर्दैवी घटना असावी. आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुळ्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते. पण ते जीवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्युनंतर मात्र काही तासातच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणून-बुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळे त्यांच्याविरूद्ध ३०२ चा गुन्हा का दाखल होऊ नये? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण फक्त त्यांना योग्य मोबदला देण्यापुरते मर्यादित नाही. या आत्महत्येतून इतरही अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. औष्णिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन संपादित करताना त्यांना केवळ ४ लाख रुपये देण्यात आले. पण बाजूलाच एका मंत्र्याचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह गिरासे यांची शेती होती. त्यांना मात्र ७८ गुंठ्यांसाठी तब्बल १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला कसा मिळाला? अशी विचारणा विखे पाटील यांनी केली.