जळगाव । चाळीसगाव येथील दाम्पत्याच्या जागी बनावट दाम्पत्य उभे करून त्यांच्या नावावरील जमिनीचे ७ एप्रिल २०१६ रोजी ६ खरेदी खत केले होते. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोन संशयिताना अटक केली होती.
त्यांनी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज बुधवारी फेटाळला आहे. तर याच प्रकरणातील तीन संशयितानी दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्जही बुधवारी न्यायाधीश पटणी यांनी फेटाळला आहे.
डांबून ठेवत रोकडसह सहींचे चेक घेतले
चाळीसागाव येथील सुधीर निकम आणि अनिता निकम यांच्या नावावर असलेली मिळकत तोतया इसम बसवून ७ एप्रिल २०१६ रोजी विक्री केली होती. तर संशयितानी सुधीर निकम यांना डांबून ठेवून २५ हजार रुपये रोख आणि सह्या केलेले 36 धनादेश घेतले होते. या प्रकरणी निकम यांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी चाळीसगाव पोलिस ठाण्यात ५ जणांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ श्रावण पांचाळ, सुरेश राजू नाईक यांना १२ जानेवारी रोजी अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यावेळी त्यांनी न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज बुधवारी फेटाळला आहे. तर याच प्रकरणातील संशयीत सोमनाथ खंडू निकम, रवी खंडू निकम, रंगनाथ नाना मांडोळे यांनी देखील न्या. पटणी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. देखील अर्जही न्या. ए.के. पटणी यांनी बुधवारी फेटाळले आहे. याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले तर संशयितातर्फे अॅड. व्ही. आर. ढाके यांनी कामकाज पाहिले.