दोघांच्या भांडणात जनतेचे काय होणार?

0

नवी दिल्ली । देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांप्रमाणे दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांमध्येही कमळ फुलले आहे. त्यामुळे महापालिका भाजपकडे आणि राज्याची सत्ता मात्र आपच्या ताब्यात अशी परिस्थिती राजधानीत कायम राहिली आहे. या दोन पक्षांमधला ‘तु तु मै मै’चा वाद कसा रंगतो, हे वेळोवेळी पहायला मिळाले आहे. या दोन पक्षांच्या साठेमारीत जनतेचा फायदा होणार की, नुकसान असा प्रश्‍न सामान्य दिल्लीकरांना पडला आहे.

2015 मध्ये राजधानीत आपचे सरकार बनले. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. मुख्यमंंत्री झाल्यापासून केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच भाजपवर दिल्ली सरकार करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप केले आहेत. त्यामुळे सलग तिसर्‍यांदा भाजपने दिल्ली महापालिकांमधील सत्ता कायम राखल्यानंतर त्यांच्याकडून सामान्य दिल्लीकर विकास कामांची अपेक्षा बाळगून आहे. दिल्ली महापालिकेत कामे केली नसल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपने जुन्या चेहर्‍यांना डावलून तिथे अनेक नविन चेहरे दिले होते. आता या नवीन नगरसेवकांकडून दिल्लीवासीयांना भरपूर अपेक्षा आहेत. याशिवाय पाणी, साफसफाई, महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या पगारावरून भाजप आणि आपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्‍लेषकांच्या मते राजधानीत या दोन्ही पक्षात असलेले तु तु मै मै चे वातावरण कायम राहणार आहे. विकास होत नसेल तर राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतातच. काही प्रकरणांमध्ये आप ने काहीही कारण नसताना केंद्र सरकारवर टीका केली होती. दुसरीकडे भाजपनेही, जी चांगली कामे व्हायलाच पाहिजे होती त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे. आपला हे काम शासकीय निधीतून करायचे होते. पण या प्रकरणाची फाइल केंद्र सरकारने परत पाठवली. शहरात साफ सफाई न झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपची की राज्य सरकारची? कामाच्या जबाबदार्‍या निश्‍चित कोण करणार? पण, या वादात सामान्य जनताच भरडली जाणार ना?

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतील ठळक वैशिष्ट्ये
दिल्ली महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी 2500 उमेदवारांनी नशीब अजमावले. त्यातील 697 उमेदवार कोट्याधीश होते. महापालिकेच्या एका बैठकीसाठी नगरसेवकांना 300 रुपयांचा भत्ता मिळतो. त्यामुळे कोट्याधीश असूनही या लोकांना नगरसेवक का बनायचे आहे? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद उस्मान यांनी 36 कोटींचे मालक असल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने 21 ते 74 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 21 वर्ष वय असलेले 10 उमेदवार या निवडणुकीत होते. यंदा पहिल्यांदाच दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत नाटाचा प्रयोग करण्यात आला. लोकसभेच्या नियमानुसार 7 एप्रिल 1958 रोजी दिल्ली महापालिका अस्तित्वात आली. पंडित त्रिलोकचंद शर्मा दिल्लीचे पहिले महापौर बनले.

– दक्षिण दिल्ली महापालिका
भाजप-10
काँग्रेस-12
आप-16
इतर-6
एकूण – 104

– उत्तर दिल्ली महापालिक
भाजप- 65
काँग्रेस-15
आप-19
इतर- 5
एकूण -103

– पूर्व दिल्ली महापालिका
भाजप-40
काँग्रेस-6
आप-10
इतर-3
एकूण-63

भाजपचा विजय सीआरपीएफच्या शहिद जवानांना समर्पित
नवी दिल्ली । राजधानी दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जबरदस्त फरकाने विजय मिळवत काँग्रेस आणि आम आदमीचा जोरदार झटका दिला आहे. दिल्लीत कमळ फुलल्यानं भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर फटाके फोडणे, गुलाल उधळणे, बँड वाजवित आनंद साजरा केला जातो. मात्र, दिल्लीमध्ये मोठा विजय मिळविल्यानंतरही भाजप आपला विजयोत्सव साजरा केला नाही. दिल्ली जिंकल्यानंतरही एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतील. मात्र, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, मिठाई वाटणे असे कोणतेही कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. 24 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये 150 जवानांच्या ताफ्यावर 300 नक्षलवाद्यांनी एकदम हल्ला केला. या अंदाधुंद गोळीबारात 25 जवान शहीद झाले. यामुळे दिल्ली महानगरपालिकेतील विजय साजरा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिल्ली महापालिकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. प्रत्येकाच्या मनात सुकमामधील हल्ल्याचे दु:ख आहे. नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून विजय साजरा करण्यात येणार नाही. आम्ही आमचा विजय शहीद जवानांना समर्पित करतो, असे दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. पहिले काही निकाल हाती आल्यानंतर तत्काळ भाजपच्या दिल्ली कार्यालयाबाहेर मोठे पोस्टर लावून शहिदांना विजय अर्पण करत असल्याचे म्हटले आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी दिल्लीवासीयांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल म्हणजे दिल्ली सरकारच्या कामकाजावर आलेले सार्वमत असल्याचं सांगत त्यांनी केजरीवालांवर हल्ला चढवला आहे.

अगली बार भाजप सरकार
दिल्ली महापालिकांच्या निवडणुकीतील निकाल जाहीर झाल्यावर पुढील वर्षी, 2018मध्ये राजधानीत होणार्‍या विधानसभांच्या निवडणुकीतील चित्रही स्पष्ट झाले असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. महापालिका निवडणुकीतील या निकालांच्या आधारावर भाजप आगामी विधानसभा निवडणूक जिंकेलच याशिवाय 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकींसाठी इतर पक्षांची नाकाबंदीही करेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा अश्‍वमेघ रोखण्यासाठी युपीएतील घटक पक्ष काँग्रेससह महाआघाडी उभी करण्याची तयारी करत आहेत. पण दिल्ली महापालिकेच्या निवडणूक निकालांनी देशातील भावी राजकीय रणनीतीचे संकेतही दिले आहेत. दिल्ली महापालिकेच्या निवडणूक निकालांना महाआघाडीने कमी लेखल्यास महाआघाडीला त्याचा फटका बसू शकतो. याचे कारण म्हणजे दिल्लीमध्ये देशातील जवळपास सर्वच राज्यांचे नागरिक रहायला आहेत. या लोकांचा निर्णय हा देशातील जनतेचा निर्णय समजला जातो.