सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीला फटकारले
नवी दिल्ली : राजस्थानातील खाप पंचायतीसह विविध जातीय पंचायतींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जोरदार फटकार लगावली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले, की जर दोन सज्ञान स्त्री व पुरुष विवाह करत असतील तर तिसरा व्यक्ती त्या दोघांमध्ये दखल देऊ शकत नाही. मग् ते कुटुंबीय असोत, समाज असो किंवा अऩ्य कुणीही असो. या विवाहित जोडप्यांना वेगळे करण्याचा अधिकार कुणालाही नाही. खोट्या प्रतिष्ठेपायी होणार्या ऑनर किलिंगवर बंदी घालण्याची मागणी करणार्या एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केले. खाप पंचायतीविरोधातील या याचिकेवर आता 16 फेब्रुवारीरोजी पुढील सुनावणी होणार आहे.
काय म्हणाले सरन्यायाधीश..!
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की कुणीही वैयक्तिकरित्या, सामूहिकरित्या अथा संघटनात्मकरित्या लग्न-विवाहात दखल देऊ शकत नाही. दोन सज्ञान व्यक्ती जर विवाह करत असतील तर त्यांना वेगळे करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. आम्ही काही येथे गोष्टी लिहण्यासाठी बसलो नाहीत, किंवा येथे बसून लग्न कशा प्रकारे होऊ लागलीत हे पाहण्यासाठीही येथे बसलो नाहीत. यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी खाप पंचायतीच्या वकिलांना चांगलेच फटकारले. दोन वयस्क व्यक्तींच्या लग्नात हस्तक्षेप करणारे आपण कोण आहात? कायदा त्यांच्या पद्धतीनेच काम करेल. आपण अशाप्रकारच्या जोडप्याबद्दल अजिबात काळजी करू नका, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्याची आहे. आम्ही तर या बाबीने चिंतीत आहोत,की अद्यापही दोन सज्ञान व्यक्तींना त्यांचा अधिकार वापरू दिला जात नाही. दोघांच्या मध्ये तुम्ही अजिबात हस्तक्षेप करू नका, असेही सरन्यायाधीशांनी खाप पंचायतीला फटकारले. या याचिकेची सुनावणी सुरु असतानाच, दिल्लीत झालेल्या अंकित सक्सेना याच्या हत्येचाही उल्लेख याचिकाकर्त्याने सरन्यायाधीशांसमोर केला. त्यावर सक्सेसा हत्याकांड हे ऑनर किलिंग असून, त्यासाठी जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही सरन्यायाधीशांनी दिलेत. सद्या हे प्रकरण आमच्या समोर नसल्याने त्याबाबत आम्ही फार काही बोलू शकत नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
प्रेमविवाह करणार्यांची न्यायालयास चिंता
प्रेमविवाह करणार्या जोडप्यांवर खाप पंचायतीकडून अत्याचार होतात. खापसारख्या स्वयंभू न्यायालयांवर बंदी आणण्यासाठीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढलेत. खाप पंचायतीचे अधिकार काय, याची चिंता न्यायालय करत नाही. प्रेमविवाह करणार्या जोडप्यांचे अधिकार आणि सुरक्षा याची चिंता न्यायालय करते, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. सज्ञान व्यक्ती जर विवाह करत असतील तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. तसे करणे हे कायद्याचे उल्लंघन असेल, असा निर्वाळाही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला. याबाबत मार्गदर्शकतत्वे जारी करण्यासही न्यायालय तयार झाले.