पुणे । मोबाईलचे दुकान फोडून 4 लाख 36 हजार 617 रुपये किंमतीचे 46 मोबाइल लांबविल्याप्रकरणी आणखी दोन सराईतांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. भैरूमल रावल (वय 20) आणि जितेंद्र सुमेंद्रसिंग राठोड (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.
राजुगिरी गोस्वामी (वय 20) याला या प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 ते 6 ऑगस्ट 2017 या कालावधीत वडगावशेरी भागातील गुरू गणेश मोबाईल शॉपी येथे घडली होती. याबाबत निखील लुनावत यांनी फिर्याद दिली आहे. रावल आणि राठोड या दोघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली.