शिरपूर । शहरातील शहादा रोडवरील किराणा दुकान व अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी काही तासातच चोरी करणार्या गुन्हेगारांचा छडा लावला असून तीन जणांना अटक केली आहे. पैकी दोन जण अल्पवयीन आहेत. रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास शहादा मार्गावरील र्मचट बँकसमोरील बाबुजी सुपर शॉपी दुकानाचा पत्रा उचकावून चोरटयांनी आत प्रवेश केला. चोरटयांनी गल्ल्यातील रोख 8 हजार रूपये व आयडीबीआय बँकेचे डेबीट कार्ड चोरून नेल़े 9 रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी हर्षल अशोक अग्रवाल गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत दुकानमालक अग्रवाल यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकी गेली चोरीस
स्वामी विवेकानंद नगरातील प्लॉट नंबर 6 मध्ये राहणारे किशोर भिकन भोई यांनी घरासमोर दुचाकी (गाडी क्रमांक एम़एच़18-एक्यू-2495) उभी केली होती. 9 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी त्यांची गाडी चोरून नेली. बादल उदेसिंग पावरा हे बालाजी नगरात भाड्याची खोली करून राहतात. ते रविवारी रात्री त्यांच्या अंगणात झोपले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगणात लावलेली गाडी क्रमांक एम़एच़18- एएम-6472 व खिश्यातील 6 हजाराचा मोबाईल चोरटयांनी चोरून नेला किराणा दुकानात चोरी झाल्यानंतर सीसीटीव्हीत कैद झालेला संशयित आरोपी अनिल रूमल्या पावरा (28, रा. वाघाडी) याला पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर व पथकाने किराणा दुकान परिसरात फिरताना अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली आहे. तर स्वामी विवेकानंद व बालाजी नगर येथून दुचाकी चोरी करणार्या दोन अल्पवयीन मुलांना शिरपूर पोलिसांनी वरझडी रस्त्यावरील गजानन कॉलनीतून रविवारी सकाळी अटक केली.