रायपूर – हिंमत, उत्साह, मेहनत आणि मनात असलेली देशप्रेमाची भावना याच्या जोरावर कोब्रा बटालियनचा जवान व महाराष्ट्राचा सुपुत्र बी रामदास याने एक मोठी लढाई जिंकली आहे. रामदासने छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपले दोन्ही पाय गमावले. सर्वांनाच वाटले की यामुळे रामदास तुटून जाईल. मात्र रामदासने आपल्या आशावादी वृत्तीचे प्रदर्शन करत एक आदर्श निर्माण केला. यात त्याला त्याच्या पत्नीचे प्रेम व मित्रांचीही साथ मिळाली.
पत्नीने दिली साथ
रामदास यांची पत्नी रेणुका यांनी त्यांना या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. रामदासचा उत्साह वाढावा म्हणून पत्नी रेणुका त्यांचा जवानाचा गणवेश घालून त्यांच्यासमोर येत. समाज माध्यमांवर रामदास आणि त्यांच्या पत्नीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात रामदास यांच्या सोबत त्यांच्या पत्नी रेणुका असून त्यांनी जवानाचा गणवेश घातलेला आहे. हा फोटो पाहून लोक रामदास आणि त्यांच्या पत्नीच्या धैर्याचे कौतूक करत आहेत. रेणुका यांनी म्हटले आहे की जवानाची पत्नी होणे ही नशिबाची गोष्ट आहे.
कृत्रिम पाय बसविले
दुसरीकडे दोन्ही पाय गमावून देखील हे सर्व कसे केले या लोकांच्या प्रश्नाला रामदास यांनी उत्तर दिले, की ‘पायच तर गेले आहे, मात्र प्राण अजूनही बाकी आहे.’ रामदास यांच्या बटालियनच्या सहकाऱ्यांनी त्यांना मोठी मदत केली. त्यामुळे ते मानसिक पातळीवर लवकर बरे होऊ शकले. तब्येत चांगली झाल्यानंतर रामदासने पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांना कृत्रीम पाय बसवण्यात आले. त्यानंतर रामदास २७ मे २०१८ ला पुन्हा कामवर रुजू झाले. यावेळी त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
कोब्रा बटालियन
सर्वांनाच वाटत होते की रामदास पुन्हा कामावर रुजू झाले तरी ते कागदोपत्री कामातच राहतील. मात्र रामदास पुन्हा कँपमध्ये आले आणि १०० मीटर अंतरावरून पायांशिवायच बंदुक हातात घेतली आणि सर्व ६ गोळ्या लक्ष्यावर झाडल्या. या सर्व गोळ्या रामदास यांच्या धैर्याप्रमाणेच लक्ष्याला भेदून पुढे गेल्या. अगदी सामान्य शरीरयष्टी असलेल्या रामदास यांचा उत्साह व धैर्य असामान्य आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यात रामदास आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोब्रा बटालियनच्या किरनापूर छावणीतील व्यायामशाळेत व्यायाम करत होते.
सुकमा येथे २९ नोव्हेंबर २०१७ ला झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात कोब्रा बटालियानमध्ये काम करत असलेल्या रामदास यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. पेट्रोलिंग करत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आईईडीच्या स्फोटात कॉन्सटेबल रामदास सापडले. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर रामदास यांना किस्टाराम पोस्ट येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे दोन्ही पाय काढावे लागले. मात्र हा कठिण प्रसंग देखील रामदास यांचे धैर्य कमी करू शकला नाही.