शिक्षकांनीच उघडकीस आणला प्रकार : अल्पवयीन मुलांचे कृत्य
दोघीही सख्ख्या बहिणी, आईची पोलिसांत तक्रार दाखल
पिंपरी-चिंचवड : पिंपरीत दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 14 व 16 वर्षीय आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. शाळेत मुलींना शिक्षकांनी ’गूड टच’ आणि ’बॅड टच’ याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी आपल्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर चार महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे.
पाच व सहा वर्षांच्या मुलींवर झाला अत्याचार
पोलिसांच्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिलेने याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीगाव येथे 3 जानेवारी ते 18 एप्रिल या कालावधीत 14 आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी फिर्यादी महिलेच्या पाच आणि सहा वर्षीय बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. शाळेमध्ये मुलींना शिक्षकांनी गूड टच आणि बॅड टच याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षकांनी ही बाब मुलींच्या पालकांना सांगितली. 30 वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबत फिर्याद दिली आहे. फौजदार रत्ना सावंत या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
गूड अॅण्ड बॅड टचद्वारे फुटली अत्याचाराला वाचा
शाळेमध्ये मुलींना सरकारच्यावतीने बॅड टच आणि गुड टच हे वर्गात शिकवले जात आहे. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित दोन्हीही सख्ख्या बहिणींनी शिक्षकाला आपबिती सांगितली. शिक्षकाने मुलीच्या आईला या गंभीर प्रकाराबाबत माहिती दिली. आरोपी हे मुलींना घराच्या बाहेर खेळायला नेत तसेच कोणी नसताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. पीडित मुलींची आई धुणीभांडी करते तर वडील बिगारी काम करतात. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने पिंपरी पोलिसांत 14 आणि 16 वयाच्या अल्पवयीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.