औरंगाबाद व कल्याण मनपाचा कचरा डेपो प्रकरणामुळे दोन्ही मनपा आयुक्तांना हटविले
सहा सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
मुंबई: औरंगाबाद मनपा क्षेत्रातील कचरा डेपो आणि कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील अनाधिकृत बांधकाम व कचरा डेपोला लागलेली आग या दोन्ही प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दखल घेतली. त्यामुळे औरंगाबाद मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांची उचलबांगडी करीत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावर तर कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त पी वेलरासू यांची सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ येथे बदली केली आहे. यासोबत सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.
सुट्टीवर असलेले जी बी पाटील यांची उल्हासनगर मनपा आयुक्त पदावर पाठविण्यात आले असून अरुण विधळे सह सचिव कामगार विभाग यांची मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.उल्हासनगर मनपा आयुक्त पदावर असलेले राजेंद्र निंबाळकर यांची पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर तर मत्स्यव्यवसाय आयुक्त असलेले जी एम बोडके यांची कल्याण डोंबिवली मनपाच्या आयुक्त पदावर पाठविले आहे. सध्या औरंगाबाद येथील कचरा प्रश्न पेटलेला आहे. या प्रकरणी ठपका बसलेल्या आयुक्त मुगळीकर यांची उचलबांगडी केली गेली आहे तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणारे पी. वेलरासू यांची बदली राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याची चर्चा आहे.