चाळीसगाव। औरंगाबाद रोड वरील रांजणगाव शिवारात असलेल्या हॉटेल चॅलेंज एस.एस.पी.एस.शेटी पेट्रोल पंपामधून मोबाईल, मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण 51 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरणार्या दोन चोरट्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धुळे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले असून त्यांनी चोरीतील मोटारसायकल व मोबाईल काढून दिला आहे. चाळीसगाव-औरंगाबाद रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वर रांजणगाव शिवारातील हॉटेल चॅलेंजच्या बाजूला असलेल्या एस.एस.पी.एस.शेटी सन या एच.पी.पेट्रोल पंपावरील स्टोरमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास 31 हजार 53 रुपये रोख 15 हजार रुपये किमतीची बजाज सिटी 100 क्र.एम.एच.18 ए.यू 7988 मोटारसायकल व 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. या प्रकणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला 56/2017 प्रमाणे असलम अयुब पिंजारी (38) रा चाळीसगाव रोड धुळे याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसर्या दिवशी अटक : धुळे येथील पेट्रोलपंपावरील दरोड्या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, हवालदार प्रकाश मोहाने व पोलीस नाईक कोठावदे यांनी चोरी गेलेल्या मोबाईल चे ई एम आय नंबर व मोबाईल च्या लोकेशन वरून आरोपींचा शोध घेऊन 12 तासाच्या आत त्याच दिवशी 16 जुलै रोजी रात्री 11:58 वाजता वरील दोघा आरोपीना अटक केली होती. त्यावेळी या आरोपींनी 10 हजार रुपये रोख व मोबाईल, ब्रेसलेट कडून दिले होते.
धुळे येथे दरोडा
धुळे शिवारातील सुरत ते नागपूर महामार्ग क्र 6 वर अजंग गावातील शिवारात कोयल पेट्रोल पंपावर 16 जुलै रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पंपावर दरोडा टाकुन लुट केल्याची घटना घडली होती. सदरचा प्रकार रोडच्या कामावरील जेसीबीच्या ड्राइवर बाजूला झोपलेले असतानां त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता डोक्यात लाकडी दांडा मारून त्यांचा खून केला व पेट्रोल पंपावरील 10 हजार रुपये रोख 3 हजार रुपयाचा मोबाईल आणि 1 हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 14 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता याविरोधात प्रकाश बुधा पाटील पेट्रोल पंप व्यवस्थापक यांनी फिर्याद दाखल केली होती.
चोरीचे साहित्य दिले
लुट झाल्यापासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. अशाच प्रकारचा गुन्हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल होता त्यात फिरोज कवाजी पवार (24), महेंद्र कवाजी पवार (21) दोघे राहणार चारठाणा मधापुरी येथील आहे. त्यांना धुळे पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. चाळीसगाव कन्नड बायपास जवळील झाडा झुडपात फेकलेली मोटारसायकल व मोबाईल काढून दिला आहे.
1 ऑगस्टपर्यत कोठडी
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी वरील दोघा आरोपीना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर आज 29 रोजी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा आरोपीना 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत. यातील 2 फरार आरोपींचा शोध चाळीसगाव ग्रामीण पोलीस घेत आहेत