चाळीसगाव । शहरातील बलराम व्यायाम शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात आलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाईल चोरणार्या मालेगाव येथील दोघा खिसेकापुंना चाळीसगाव शहर पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली असुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी येथील बलराम व्यायम शाळेच्या पटांगणावर सायंकाळी 6 ते रात्री 9-30 वाजेपर्यंत हल्लाबोल आंदोलनाची सभा होती ही सभा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने येथील भडगाव रोडवरील अभिनव शाळेजवळील अतिष अनिल कदम (23) हा तरुण सभेच्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपासुन आला होता रात्री 8 वाजेच्या सुमारास मोबाईलवर फोटो काढण्यासाठी खिशात हात घातला असता खिशातील 10 हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा मोबाईल चोरी झाल्याचे कळल्यावर अतिष कदम याने शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
यासभेत काहींचे पैसे देखील चोरी गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी लागलीच डी.बी.चे हवालदार बापुराव पाटील यांना सुचना देवुन आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. येथील बामोशी बाबा दर्गा परिसरात दोन इसम संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती हवालदार बापुराव पाटील यांना मिळाल्यावरुन बापुराव पाटील, पो कॉ गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, गणेश सुर्यवंशी, नरेंद्र नरवाडे, तुकाराम चव्हाण, हितेश चिंचोरे यांनी त्याठिकाणी जावुन आरोपी मोहम्मद हारुन अब्दुल मन्नान (32) रा. मुन्शी साबान नगर गल्ली नं. 2 मालेगाव व मोहम्मद इम्रान अब्दुल हमीद (28) रा. गुलशानाबाद गल्ली न 3 मालेगाव यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्याच वेळेस आतिष कदम याने दुसर्याच्या मोबाईल वरुन चोरी गेलेल्या मोबाईलवर कॉल केला असता त्याठिकाणी मोबाईल वाजल्यावर पोलीसांनी फोन उचलल्यावर दोघा आरोपींना रात्री 9 वाजेच्या सुमारास एकाच तासात चोरलेला मोबाईल व 940 रोख रकमेसह ताब्यात घेवुन त्यांच्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.