दोन गाड्यांचे रेल्वे इंजिन फेल, दीड तास प्रवासी ताटकळले

0

म्हसावद व जळगाव स्थानकावरील घटना

भुसावळ– डाऊन रेल्वे मार्गावरील म्हसावद व जळगाव स्थानकावर डाऊन दादर-अमृतसर व काझी पेठ-पुणे या एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनात बिघाड झाल्याने सुमारे दिड तास प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. मालगाडीचे पर्यायी इंजिन लावून या गाड्या रवाना करण्यात आल्या. या प्रकाराने मात्र डाऊन मार्गावरील तीन गाड्या तब्बल अर्धा तास उशिराने धावल्याने मंगळवारी पहाटे प्रवास करणार्‍या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

तांत्रिक बिघाडाने इंजिन पडले बंद
अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार, डाऊन 11057 दादर-अमृतसर एक्स्प्रेस म्हसावद-शिरसोली स्थानक ादरम्यान असतांना मंगळवारी पहाटे 5 वाजून 3 मिनिटांनी इंजिनात बिघाड झाला. तब्बल 90 मिनिटे (दिड तास) गाडी जागेवर थांबून होती. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता केपीएल-बीसीएन या मालगाडीचे इंजिन लावून ही गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

जळगावातही ‘काझीपेठ’ च्या इंजिनात बिघाड

जळगाव रेल्वे स्थानकावरून जाणार्‍या अप 22152 पुणे-काझीपेठ एक्स्प्रेसच्या इंजिनातही बिघाड झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी जळगाव स्थानकावर घडला. दुसर्‍या मालगाडीचे इंजिन लावल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. सुमारे दिड तास प्रवाशांना येथेही ताटकळत रहावे लागले.

इंजिन फेल ; तीन गाड्या अर्धा तास उशिराने
जळगाव रेल्वे स्थानकासह म्हसावद स्थानकानजीक दोन गाड्यांच्या इंजिनात झालेल्या बिघाडाने डाऊन मार्गावरील तीन गाड्या सुमारे अर्धा तास उशिराने धावल्या. त्यात डाऊन 11093 डाऊन महानगरी, 12167 वाराणसी सुपरफास्ट व 22847 विशाखापट्टणम या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली.