पुणे : तमाशाची सुपारी घेऊन भिवाडे व उंडेखडक या ठिकाणी तमाशा सादर न करणार्या किसनराव साळवेसह संगीता पुणेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाविरुद्घ फसवणुकीची तक्रार वल्लभशेठ बेनके नगरी तमाशा कलापंढरीच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ या तमाशाचा फडमालक गुरुवारी रात्री तमाशाची राहुटी घेऊन फरार झाला असून, या फडाला तमाशा पंढरीत राहुटी लावण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तमाशा पंढरीचे उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल व संचालक संजय अडसरे यांनी दिली़
किसनराव साळवेसह संगीता पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ हा फड दोन-तीन वर्षांपासून नारायणगावच्या तमाशा पंढरीत येत आहे़ नवीनच असलेल्या या तमाशाचा फडमालक किसनराव साळवे शिरूर तालुक्यातील आहे़ या फडाच्या सहा ते सात सुपार्या या हंगामात गेल्या आहेत़ गेल्या सोमवारी भिवाडे (ता. जुुन्नर), तर मंगळवारी उंडेखडक या ठिकाणी तमाशा खेळाची सुपारी घेतली होती़ परंतु, या फडाने या दोन्ही ठिकाणी तमाशा सादर केला नाही़ विशेष म्हणजे उंडेखडकला ज्या दिवशी तमाशा होणार होता, त्या दिवशी सकाळी किसनराव साळवे भेट दिली होती. कलाकारांची गाडी नादुरुस्त झाल्याचे कारण सांगून साळवे यांनी ग्रामस्थांकडून 15 हजार रुपयेही घेतले होते.
या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी नारायणगाव तमाशा पंढरीत येऊन पाहणी केली असता फडाची राहुटी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ सुपारी घेऊन तमाशाचा खेळ सादर न करता ग्रामस्थांची फसवणूक केल्याने तमाशा पंढरीच्या वतीने संबंधित फडमालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी मागणी सर्व राहुट्यांचे मालक व व्यवस्थापकांनी नारायणगाव पोलिसांत केली आहे़