यावल। वेळीच जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याने डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यात विद्यमान उपसरपंच रमेश सांडू कोळी ग्रामपंचायत सदस्या रेखा काशिनाथ कोळी या दोघांचा समावेश आहे. डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या आरक्षीत जागेवर रमेश कोळी (उपसरपंच) समाधान हरी कोळी रेखा कोळी हे तीन सदस्य निवडून आले होते.
अप्पर जिल्हाधिकार्यांकडे चालले कामकाज
राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार या सदस्यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, मुदतीत त्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्याविरूध्द नर्मदा कोळी यांनी अप्पर जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे कामकाज चालले. गुरूवार 8 रोजी रमेश कोळी रेखा कोळी या दोघांना अप्पर जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले. शुक्रवारी याबाबतचे पत्र यावलचे तहसीलदार कुंदन हिरे यांना प्राप्त झाले आहे. दरम्यान, डांभुर्णी येथील या दोनही सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. गावातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. या जागेवर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असून इच्छुकांनी आतापासूनच मनोमनी निवडणुकीची गणिते आखणे सुरु केले आहे. मात्र अपात्र झालेले सदस्य न्यायालयाचा आधार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.