पत्नीला गर्भाशय पिशवीचा कर्करोग
पिंपरी : प्रेमाच्या आणाभाका घेतल्या…. लग्न बंधनात अडकले…. संसाराच्या वेलीवर दोन गोंडस फुले उमलली….. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सुखाचा संसार चालू असतानाच पत्नीला असाध्य रागाने पछाडले. नवर्याने तिची काळजी घेतली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन मुलांना सोबत घेऊन तो बायकोची सेवा करू लागला. पण अचानक या दोन गोंडस मुलांना आणि आजारी पत्नीला वार्यावर सोडून तो नाहीसा झाला. ही काल्पनिक कथा नाही. हे प्रत्यक्षात घडले आहे आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ! आज ही दोन मुले आई-वडील असूनही अनाथ मुलांसारखी केविलवाण्या स्थितीत आपल्या पळून गेलेल्या बापाची वाट पाहत आहेत.
सलीम हा उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगर शहरातील. घरची गरिबी असल्याने लहान वयातच शाळेचा रस्ता चुकलेला सलीम तरुणपणात भाकरीच्या शोधात मिळेल ते काम करत 12 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आला. औरंगाबाद पासून 70 किलोमीटर दूर असलेल्या वैजापूर शहरात तो मिळेल ते काम करून आपली गुजराण करू लागला. दरम्यान सलीम राहत असलेल्या परिसरात त्याची आणि रुखसार नावाच्या तरुणीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या विवाहासाठी रुखसारच्या कुटुंबियांनी कडाडून विरोध केला, पण त्या विरोधाला झुगारून दोघेही एकत्र आले.
औरंगाबादमध्ये झाली ओळख
लग्नानंतर सलीम आणि रुखसार डोंबार्याचा खेळ करू लागले. अंगातील लवचिकपणा वापरून लोकांचे मनोरंजन करायचे आणि मिळेल तेवढ्या पैशांमध्ये गुजराण करायची. पुस्तकाची पाने उलटावीत तसे दिवस आनंदात जात होते. लग्नानंतर 2-3 वर्षांनी अरमान आणि अंजुम या दोन चिमुकल्यांनी सलीम आणि रुखसार यांच्या संसारात प्रवेश केला. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने मुलांमध्ये पाहून दोघेही दिवसरात्र कष्ट उपसत होते. लग्न होऊन इतकी वर्षे झाली तरीही सलीमने रुखसारला आपल्या घरी कधीच नेले नाही. या शहरातून त्या शहरात करत ते सात वर्षांपूर्वी पुण्यात पोहोचले. कासारवाडी परिसरात राहण्याची व्यवस्था झाली. अंगात कला असल्याने दोघे पुन्हा जोमाने डोंबार्याचा खेळ करू लागले. सगळे काही ठीक चालू असतानाच रुखसार वारंवार आजारी पडू लागली. रोजच्या जगण्याची भ्रांत असल्याने तिच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता पडू लागली. कष्ट वाढले आणि कशीबशी पैशांची पूर्तता होऊ लागली.
कर्करोगाची सुरूवात
मागील महिन्यात तिचे गर्भाशयाचे दुखणे वाढू लागले. तिला 28 एप्रिल 2018 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या केल्यानंतर तिला गर्भाशयाच्या पिशवीचा कर्करोग असल्याचे निदान झाले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू झाले. आपल्या प्रत्येक संकटात आपला नवरा आपल्यासोबत आहे, हे समाधान रुखसारला आजाराविरोधात लढण्याचं बळ देत होतं.
पण नियतीला तिला आणखी एक धक्का द्यायचा होता. दहा दिवस पत्नीची सोबत केल्यानंतर सलीम अचानकपणे पत्नी आणि दोन मुलांना सोडून रुग्णालयातून 9 मे रोजी पसार झाला. 9 वर्षांचा अरमान आणि 7 वर्षांची अंजुम त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. एक दिवस झाला तरीही बाप आला नाही म्हणून मुलांनी आपल्या आईला सांगितले. हे ऐकून तिच्यातील उरले सुरले अवसनाही गळून पडले. तरीही तिला वाटले काही काम असेल, आज नाही आला उद्या येईल; पण सात दिवस उलटून गेले तरी सलीम परतला नाही. दोन चिमुकल्यांसह रुखसार सलीमच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.
… तर मुले बालआश्रमात
या मुलांची ही चित्तरकथा ऐकून रिअल लाईफ रिअल पिपल या सामाजिक संस्थेने दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली आहे. रुखसारच्या माहेरी याबाबत निरोप पाठविण्यात आला आहे. तिच्या माहेरच्या मंडळींनी मुलांना सांभाळण्यास नकार दिला तर बालकल्याण समितीला विनंती करून समितीच्या निर्णयाप्रमाणे मुलांना बालआश्रमात सोडण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक एम. ए. हुसैन यांनी दिली. तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, वैद्यकीय उपअधीक्षक शंकर जाधव, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ रुखसारकडे लक्ष देत आहेत.
ज्यावेळी आपल्या जोडीदाराची खरी गरज असते, अशा वेळी त्याने साथ सोडावी. या दुःखाने ती व्याकुळ झाली आहे. पण या या प्रकरणाला वेगळी बाजू देखील असू शकते. सलीम खरोखरीच रुखसारला आणि मुलांना कंटाळून निघून गेला का ? की तो पैशांची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडला ? की तोच एखाद्या संकटात सापडला आहे ? की अन्य काही ….. पुढे काय घडणार हे नियतीच जाणत असेल. पण रुखसार मनातून खुदा कडे दुवा मागत असेल……देवाने तिची हाक लवकर ऐकावी आणि तो पुन्हा परत कुटुंबाकडे येऊ दे, हेच देवाला मागणे.