जळगाव । महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती कांचन विकास सोनवणे यांनी त्यांच्या प्रभागातील रस्ते खराब झाल्याने ते त्वरीत दुरूस्त करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना शनिवार 5 ऑगस्ट रोजी निवदेनाद्वारे केली आहे.
सभापती सोनवणे यांनी जुना आसोदा रोडवरील खडी व मुरूम टाकून रोलरने रस्ता सपाटीकरण दोन दिवसात करून न दिल्यास महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाचा राजीनामा देवून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
अशी आहे रस्त्याची दुरवस्था
प्रभाग क्र. 5 मधील जुना आसोदा रोड चौफुलीपासून होले यांच्या चक्की पर्यंतचा रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि पाण्याचे डबके साचले असून या रस्त्यांवरून आसोदा येथून एमआयडीसीमध्ये बरेच नागरिक, तसेच मेस्कोमातानगर, दिनकर नगर या भागातील विद्यार्थी याच रस्त्यांचा वापर करीत आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे रस्ता खराब झाल्याने जाणे देखील जिकरीचे झाले आहे. परिसरातील नागरिक कांचन सोनवणे ह्या नगरसेविका असल्याने वारंवार त्यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी करीत असतात. परंतु, कांचन सोनवणे यांनी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगूनही नागरिक त्यांचे ऐकत नाहीत.