दोन दिवसीय नृत्य महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात

0

जागतिक नृत्य दिनानिमित्त टॅलंट हंट

पिंपरी : स्पर्धेचे युग असून कलागुणांना वाव देवून त्यांच्यात असणारी कलात्मकता प्रेक्षकांसमोर मांडणे. ही अवघड गोष्ट आहे. पण, हे विद्यार्थी आपली कलात्मकता उत्तमरित्या सादर करीत आहेत. त्यांनी असेच आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली पाहिजे. लहानपणापासून फक्त अभ्यासापेक्षा मुलांचे कलागुण हेरून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल शरदचंद्र पाटणकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत 3234 डी 2 आणि नृत्यतेज अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय लायन टॅलंट हंट 2018 आणि नृत्य महोत्सवाचे उद्घाटन पाटणकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक नृत्य दिनानिमित्त या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाट्यछटा, वादन, गायन, सौंदर्य अशा विविध स्पर्धांचा संगम पाहायला मिळाला. या प्रसंगी श्रध्दा पेठे, लायनच्या सांस्कृतिक अध्यक्षा व नृत्यतेज अ‍ॅकॅडमीच्या संचालिका तेजश्री अडिगे, उमा पाटील, सीमा पारेख आदी उपस्थित होते.

स्वतःची ओळख निर्माण करावी
यावेळी तेजश्री अडीगे म्हणाल्या की, आपले कलागुण सादर करताना लहान मुलांच्या कलागुणांना भरारी मिळावी. त्यांना स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ लाभावे. या व्यासपीठावर आपली कला सादर करुन स्वतःची ओळख निर्माण करावी. आपल्यातील प्रतिभा एकमेकांच्या साथीने जगाला दाखवून स्वतःला सिध्द करावे. या उद्देशाने हा नृत्य महोत्सव घेण्यात येत आहे. या प्रसंगी गायन, वादन, नाट्यछटा स्पर्धा पार पडल्या. त्याला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध नाट्यछटा, गायन, वादन स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण शैलीचे दर्शन या निमित्ताने प्रेक्षकांना घडविले. यावेळी मिस अ‍ॅण्ड मिसेस ही स्पर्धा घेण्यात आली. गायन, वादन आणि सौंदर्य स्पर्धा यांचा तिहेरी संगम या महोत्सवात चुरस वाढविणारा ठरला. कार्यक्रमाचे आभार शैैलजा सांगळे यांनी मानले.

दरम्यान, लहान मुलांकरिता व युवकांकरिता लायन रायझिंग स्टार या स्पर्धेअंतर्गत वाद्य वादन, गीत गायन, एकपात्री अभिनय आणि सोलो नृत्य प्रकारांचा समावेश आहे. लायन आयकॉन या व्यक्तिमत्व स्पर्धेत युवक, युवती आणि महिलांचा सहभाग असेल. बालकांचा वयोगट 6 ते 9, युवकांसाठी 10 ते 15 व 16 ते 28 आणि महिलांसाठी खुला गट आहे.