दोन पोलीस निरिक्षकांना अवैधधंदे भोवले

0

एमआयडीसीचे अनिरूध्‍द अढाव, पारोळ्याचे विलास सोनवणे यांची उचलबांगडी
जळगाव- जिल्ह्यात अवैधधंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, अशी तंबी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिली होती. वारंवार सुचना देवूनही अवैधधंद्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द अढाव व पारोळ्याचे पोलीस निरिक्षक विलास सोनवणे यांच्या गुरुवारी अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तडकाफडक्या बदल्या केल्या. याबाबतचे आदेश गुरूवारी सायंकाळी शिंदे यांनी पारीत केले.

दोन्ही पोलीस निरीक्षकांना एसपींचा दणका
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अढाव यांची जळगाव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली असून पारोळा येथील विलास सोनवणे यांची जळगाव येथे मानव संसाधन विभागात बदली केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आस्थापना मंडळाच्या सदस्यांनी पाहणी करुन अहवाल तयार केला होता. यात पोलीस निरिक्षक अनिरुध्द आढाव यांनी अधीक्षकांच्या आदेशाला खो देत अवैधधंद्याविरोधात एकही कारवाई केली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. वाढत्या तक्रारी व स्थानिक गुन्हे शाखेचे छापा टाकून अवैधधंदे खुलेआम सुरु असल्याबाबत स्पष्ट झाले होते.

अढाव यांच्या जागी रणजीत शिरसाठ यांची वर्णी
जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रणजित शिरसाठ यांची एमआयडीसीला आढाव यांच्या जागी वर्णी लागली. तर पारोळा पोलीस ठाण्यात पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन सिताराम सानप यांची प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.