दोन फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर

0

मुंबई । इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक कॉन्सर्टसाठी भारतात येत आहे. 10 मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने जस्टिन बिबरने मागण्यांची एक भली मोठी यादीच पाठवली आहे. व्हाईट फॉक्स इंडियाने जस्टिन बिबरची जी ‘डिमांड लिस्ट’ जारी केली आहे, ती वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

रुममध्ये हवा काचेचा फ्रीज
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 13 रुम बुक करा. सुरक्षेच्या कारणास्तव एक नव्हे तर 2 फाईव्ह स्टार हॉटेल बुक करा. जस्टिन बिबरच्या ड्रेसिंग रुममधील सर्व पडदे पांढरे शुभ्र हवे. त्याच्या रुममध्ये काचेचा फ्रीज हवा. जस्टिन बिबरच्या खोलीत पाण्याच्या 24 बाटल्या, एनर्जी ड्रिंकच्या 4, व्हिटॅमिन वॉटरच्या 6 बाटल्या, 6 क्रीम सोडा आणि विविध फळांचा रस. खाण्यामध्ये विविधता असावी, त्यासाठीही मोठी यादी पाठवली आहे. त्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा समावेश आहे. हेल्थ फूडच्या नावे नारळ पाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, शुद्ध देशी मध, केळी आणि हर्बल टीसह ताजी फळे, अशी यादी त्याने पाठवली आहे.

10 कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल
जस्टिन बिबरच्या जवळपास कुठेही लिलीची फुले दिसू नयेत, जस्टिन बिबरच्या संपूर्ण टीमसाठी विविध साईझचे टी-शर्ट द्यावेत, जस्टिन बिबरचा ताफा नेण्यासाठी 10 लग्झरी कार, 2 वॉल्वो बस, या ताफ्याला सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पथक हवे, याशिवाय बिबरचे 8 सुरक्षा गार्डही त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतील. जस्टिन बिबर परफॉर्म करण्यासाठी हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत रस्तेमार्गे नाही तर चॉपर (हेलिकॉप्टर) ने जाणार, जस्टिन बिबर ज्यावेळी प्रवास करेल, त्यावेळी 10 कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल. यामध्ये त्याचा सोफा सेट, प्ले-स्टेशन, वॉशिंग मशीन आणि टेबल-टेनिसचे टेबल यासारख्या साहित्याचा समावेश आहे. जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टसाठी हजारोंमध्ये तिकीटाचा दर आहे. या तिकिटांसाठी चाहते अक्षरश: गर्दी करत आहेत.

तिकीट खरेदीसाठी झुंबड
जस्टिन बिबरच्या 10 मेच्या शोसाठी तिकीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी तिकीट 5040 रुपये आहे, तर प्लॅटिनम तिकीट 15400 पर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचेही बोलले जात आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही परफॉर्म करणार आहे. मात्र त्याला गायक कैलाश खेर, अरमान मलिक आणि सोना महापात्रसारख्या अनेक दिग्गजांनी विरोध केला आहे. जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.